बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावात मुसळधार पावसामुळे घर कोसळून पाच जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तसेच अन्य तीन जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पावसाचा जोर सुरु आहे.
वाशिम जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रिसोड तालुक्यातील मांडवा येथील एका युवकाचा तर मालेगाव तालुक्यातील कोलदरा येथील शेतात काम करीत असताना एका शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. विजेच्या गडागडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात वीज पडण्याच्या अनेक ठिकाणी घटना घडल्या असून, अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुसळधार पावसामुळे उद्यानाची भिंत कोसळल्याने भिंतीखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथमधील महालक्ष्मी नगर गॅस गोडाऊन परिसरात ही घटना घडली आहे. उद्यानाची भिंत घरांवर कोसळल्याने 5 ते 6 घरांचं मोठं नुकसान झालं आहे. यावेळी ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला. अग्निशमन दल आणि पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य सुरु केले आहे.
कल्याण-डोंबिवलीत विजेच्या कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार वाऱ्यामुळे द्वारली गावात दोन झाडे कोसळली. यामुळे एका रिक्षासह घराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. फायर ब्रिगेडकडून झाड हटविण्याचे काम सुरु आहे.
नाशिकमध्ये पावसाचा हाहा:कार
नाशिकच्या देवळा भागातही पावसाचा हाहा:कार बघायला मिळाला. पावसामुळे अनेक झाडं जमीनदोस्त झाली. तर काही ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह होत असलेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.