देवाच्या दारात धर्म किंवा जात नाही तर भक्ती महत्त्वाची असते. आपली श्रद्धा आणि भक्ती ही शेवटच्या श्वासापर्यंत निभावणाऱ्या कीर्तनकाराला देवाची भक्ती करता करता मृत्यूनं गाठवलं. प्रसिद्ध कीर्तनकार ताजुद्दीन बाबा महाराज यांना कीर्तन करत असताना हृदयविकाराचा मोठा धक्का आला. कीर्तन करताना ते स्टेजवर खाली बसले. त्यांच्यासाठी तिथले लोक पाणी आणेपर्यंत त्यांनी आपले प्राण सोडले.
नंदुरबारमध्ये किर्तनादरम्यान हृदयविकाराचा झटका येऊन ताजुद्दीन बाबा महाराज यांचं निधन झालं. ताजुद्दीन बाबा यांच्या पार्थिवावर आज जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील बोदलापूर या ठिकाणी इस्लाम धर्मातील रितीरिवाजाप्रमाणे दफनविधी करण्यात आला. घनसावंगी तालुक्यातील त्यांच्या भक्त परिवाराने त्यांचं अखेरचं दर्शन घेतलं.
ताजुद्दीन बाबा महाराजांचा जन्म इस्लाम धर्माचा, मुस्लीम कुटुंबात जन्म झाला होता. जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील बोदलापूर हे त्यांचं जन्मगाव. त्यांनी कीर्तनाची गोडी लागली आणि त्यांनी वारकरी संप्रदायाचे कार्य हाती घेतलं. हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्र यावं यासाठी त्यांनी हजारो कीर्तन करून ऐक्यासाठी प्रचारही केला.
समाजात त्यांना सुरुवातीला खूप विरोधाला सामोरं जावं लागलं. मात्र त्यांनी आपली देवावर श्रद्धा भक्ती ढळू दिली नाही. हिंदू मुस्लीम ऐक्यासाठी हजारो किर्तन केली.त्याचा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा त्रास देखील सहन करावा लागला. ताजुद्दीन बाबा यांनी धार्मिक कट्टर पंथियांच्या विरोधाला न जुमानता वारकरी संप्रदायाचे कार्य अत्यंत निष्ठेने केलं. ताजुद्दीन बाबांच्या निधनामुळे त्यांच्या भक्त परिवारांमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे.