प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कपिल शर्मा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. अलीकडेच, त्याच्या तक्रारीच्या आधारे, मुंबई पोलिसांनी कार डिझायनर दिलीप छाब्रियाचा मुलगा बोनिटो छाब्रियाला फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. बोनीटोला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. बोनिटो छाब्रियाने कपिलची कोटींची फसवणूक केली होती.
पोलिसांनी सांगितलं की, कपिल शर्माने गेल्या वर्षी मुंबईत फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. त्याने कार डिझायनर दिलीप छाब्रियाच्या मुलावर 5.3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. कपिलने पोलिसांना सांगितलं की, त्याने स्वत:साठी व्हॅनिटी बस डिझाइन करण्यासाठी मार्च ते मे 2017 दरम्यान छाब्रियाला 5 कोटी रुपये दिले होते मात्र 2019 पर्यंत कोणतंही काम झालं नाही. त्यानंतर त्यांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलशी संपर्क साधला.
त्याचवेळी, छाब्रियाने गेल्या वर्षी कॉमेडियनला व्हॅनिटी बसचं पार्किंग शुल्क म्हणून 1.20 कोटी रुपयांचं बिल पाठवलं होतं. यानंतर कपिलने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. बोनीटोला नंतर चौकशीसाठी बोलावलं आणि नंतर गुन्हे शाखेने अटक केली.