बाळासाहेब गेले अन् ठाकरे भाषा तिथेच संपली, इतरांनी आव आणू नये : नारायण राणे
बाळासाहेब गेले अन् ठाकरे भाषा तिथेच संपली, ती शैली तो आवेष आता पाहायला मिळणार नाही. कुणीही आव आणू नका. काहीजण नाकात बोलतात, भाषा शैली नाही… म्हणजे अनेक प्रसंग मी जवळून पाहिले आहेत. नुसतं आडनाव लावलं म्हणजे ठाकरे भाषा होत नाही. तशी गुणात्मक कृती दिसली पाहिजे, तर ती ठाकरे भाषा.” असं म्हणत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले.
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! कन्फर्म तिकिटावर दुसरा व्यक्ती करु शकेल प्रवास
भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता तुम्ही तुमचं कन्फर्म असलेलं तिकीट दुसऱ्या एखाद्या प्रवाशाला ट्रान्सफर करु शकता.
रेल्वे प्रवाशी असे कन्फर्म तिकीट फक्त आपले आई-वडिल, भाऊ-बहिण, मुलगा-मुलगी, पती आणि पत्नीच्या नावावरच ट्रान्सफर करु शकतात. बदललेल्या या नियमांनुसार, रेल्वे प्रवाशी आपल्या मित्राच्या नावावर तिकीट ट्रान्सफर करु शकत नाहीत. लग्न किंवा पार्टीला जाणाऱ्या लोकांसमोर जेव्हा अशी परिस्थिती येते, तेव्हा आयोजकांना आवश्यक कागदपत्रे 48 तास अगोदर सादर करावी लागतात. रेल्वे स्टेशनला प्रत्यक्ष भेट देऊन तिकीट हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्याव्यतिरिक्त, आपण ही प्रक्रिया ऑनलाइन देखील पूर्ण करू शकता.
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर
मुंबई महापालिकेची सज्जता
करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करोना रुग्ण वाढू नयेत यासाठी दहीहंडी, गणेशोत्सवासह आगामी काळात येणारे सण साजरे करताना मुंबईकरांनी करोनाच्या नियमांचे जास्तीत जास्त पालन करणे अत्यावश्यक आहे. त्याचवेळी या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेने सर्व सज्जता केली आहे. जवळपास तीस हजार खाटांची तयारी ठेवली असून ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही याचे नियोजन करताना लहान मुलांसाठी सर्व प्रकारची व्यवस्था केल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
पुण्यात 16 वर्षापासून संशयित
बांगलादेश वासियांची घुसखोरी
पुणे पोलिसांनी काही संशयित बांगलादेशी घुसखोरांची चौकशी केली आहे. या लोकांनी ते १९९५ ते २०११ दरम्यान बांगलादेशमधून आल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. पुण्यात आल्यावर त्यांनी आधार आणि पॅन कार्ड बनवून घेतले. पोलिसांनी संशयितांचं बांगलादेशी नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी अद्याप कोणतीही कागदपत्रे जप्त केलेली नाहीत. त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या माहितीच्या आधारे, बेकायदेशीरपणे भारतात स्थलांतरित झालेल्या आणि सध्या पुण्याच्या हडपसर भागात राहणाऱ्या संशयित सात व्यक्तींना चौकशीसाठी हडपसर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.
सचिन तेंडुलकरने केले
सर्वांना खेळण्याचे आवाहन
आज २९ ऑगस्ट म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिन. या दिनानिमित्त, दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सर्वांना खेळण्याची सवय लावण्याचे आवाहन केले आहे. खेळ सर्वात आव्हानात्मक परिस्थितीत आशा आणि आनंद देतो, असे सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगितले.
जन आशीर्वाद यात्रेमुळे करोना
वाढण्याची भीती : अजित पवार
महाराष्ट्राने महाराष्ट्राचं काम केलं पाहिजे. पण एकीकडे केंद्र सरकार करोनाबाबत लक्ष द्या असे सांगते आणि नवीन चार मंत्री झाले त्यांना यात्रा काढायला सांगत आहेत. जिथे जिथे यात्रा निघाल्या जिथे गर्दी झाली त्याचा फटका निश्चितपणे तिथे काही दिवसातचं आपल्याला दिसेल. तिथे करोना रुग्णसंख्या वाढू नये या मताचे आम्ही आहोतचं पण रुग्णसंख्या वाढली तर त्याला कोण जबाबदार याचाही विचार केंद्राने केला पाहिजे,” असे अजित पवार म्हणाले.
कंदाहारमध्ये टीव्ही, रेडिओवर
महिलांच्या आवाजावर बंदी
कंदाहारमध्ये टीव्ही आणि रेडिओ वाहिन्यांवर संगीत आणि महिलांच्या आवाजावर बंदी घातली आहे. तालिबानने १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान ताब्यात घेतले. त्यानंतर काही प्रसारमाध्यमांनी त्यांच्या महिला अँकरना कामावरून काढून टाकले होते. तसेच काबूलमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर अनेक ठिकाणांहून महिला कर्मचाऱ्यांना परत पाठवण्यात आले आहे.
अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल आहे,
अद्याप तपास सुरु आहे : सीबीआय
१०० कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याची माहिती यात देण्यात आली आहे. दरम्यान,
क्लीन चीट दिल्याच्या अहवालावर सीबीआयने स्पष्टीकरण दिलं आहे. पुराव्यांनुसार अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल आहे आणि या प्रकरणी अद्याप तपास सुरु असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. सीबीआय कडून आलेल्या पत्रात असे उघड झाले आहे की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्राथमिक तपासात क्लीन चिट देण्यात आली नव्हती. इंडिया टुडेच्या अहवालानुसार, पत्रात म्हटले आहे, “ तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि अज्ञात इतरांनी अप्रामाणिक कृत्य करून फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.”
हरियाणात शेतकऱ्यांच्या एका
गटावर पोलिसांचा लाठीमार
भाजपच्या एका बैठकीला विरोध करण्यासाठी जाताना हरियाणात एका महामार्गावरील वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या गटावर पोलिसांनी केलेल्या कथित लाठीमारात सुमारे १० जण जखमी झाले.
कोकणातली लोकं केंद्र शासनाचं
म्हणणं मानत नाहीत : उदय सामंत
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नारायण राणेंवर नाव न घेता टीका केली आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम घेत असताना करोना नियमाचं विचार केला पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांपूर्वीच मांडली आहे. तिसरी लाट येऊ शकते त्यामुळे बंधने पाळली पाहिजेत असं केंद्राने सांगितले आहे. आता काही कोकणातली लोकं केंद्र शासनाचं म्हणणं मानत नाहीत त्याला मी काही करु शकत नाही त्याची दखल केंद्र शासनानं घेतली पाहिजे,” असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
भाजपकडून ईडीच्या
सुप्रिया सुळे यांना धमक्या
भाजपकडून ईडी आणि सीबीआयच्या धमक्या दिल्या जात आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या धमक्यांची खिल्ली उडवली आहे. आम्ही ईडीच्या कारवाईचं स्वागतच करतो. कारण त्याचा आम्हालाच फायदा होतो, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी भाजपला टोला लगावला आहे. राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बैठकीसाठी सुप्रिया सुळे नागपुरात आल्या होत्या. मीडियाशी बोलताना त्यांनी भाजपला टोले लगावले.
पुण्यात बाल गुन्हेगारांकडून
अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पुणे शहरात दोन सराईत बाल गुन्हेगारांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडितेला धमक्या देवून वारंवार अत्याचार केला. आरोपींनी पीडितेवर अत्याचार करताना मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यानंतर ते मुलीला तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी द्यायचे.
राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढले,
मुंबईत सतर्क राहण्याचा इशारा
राज्यात कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. मुंबईत देखील कोरोनाची प्रकरणं आढळत आहेत. अशातच मुंबई महापालिकेने कोरोनाला रोखण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता लक्षणं नसली तरीही कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तातडीने टेस्ट करावी लागणार आहे.
करवंदाची लागवड करत मुक्ताईनगरचे
शेतकरी मंगेश पाटील मालामाल
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथील मंगेश जयवंत पाटील या शेतकऱ्याने दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही 12 एकर शेतीवर करवंदाची लागवड करत लाखो रुपयांचे उत्पन्न घेतलं आहे. या करवंदांना दिल्ली आणि कोलकाता येथील बाजारपेठेत मोठी मागणी आहे. दुष्काळ असूनही मंगेश पाटील मालामाल झाले आहेत. मंगेश पाटील हे जळगाव जिल्ह्यात करवंदाची लागवड करणारे एकमेव शेतकरी आहेत. परिसरातील 200 मजूर देखील या शेतात नेहमी राबत असतात.
पॅरालिम्पिक स्पर्धेत
भाविनाने इतिहास घडवला
टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे. टेबल टेनिसपटू भाविना पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला आहे. फायनलमध्ये भाविनाला पराभव पत्करावा लागला मात्र तिने सिल्वर मेडलला गवसणी घातली आहे. फायलनमध्ये भाविनाता 3-0 असा पराभव झाल्याने गोल्ड मेडलचं तिचं स्वप्न भंगलंय.
प्रसिद्ध नाटककार
जयंत पवार यांचं निधन
प्रसिद्ध नाटककार जयंत पवार यांचं निधन झालं आहे. एक विचारी, साक्षेपी आणि संवेदनशील लेखक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने सगळीकडेच शोककळा पसरली आहे. जयंत पवार हे मराठी भाषेतील प्रसिद्ध लेखक होते. त्यांनी रचलेल्या फिनिक्सचाय राखेतून उथला मोर या कथासंग्रहासाठी 2012 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जयंत पवार हे एक पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक आहेत.
SD social media
9850 60 3590