महत्वाच्या ठळक घडामोडी

भाजपा नेत्यांशी चर्चा केल्यानंतर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेलं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवलं आहे. नारायण राणे यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या अटकेपूर्वी रत्नागिरी सत्र न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र हा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथेही योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नारायण राणे यांच्या वकिलांना दिले होते. त्यामुळे तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर नारायण राणेंच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला. पोलिसांनी भाजपा नेत्यांशी चर्चा केली आणि त्यांना अटक केली.

नारायण राणे यांचा
अटकपूर्व जामीन फेटाळला

राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान रत्नागिरी सत्र न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नारायण राणे यांच्या वकिलांना दिले आहेत. त्यामुळे तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

ते त्यांच्या संस्काराप्रमाणे
बोलतात : शरद पवार

सकाळपासूनच शिवसेना व भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे दिसत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. या सर्व घडामोडींवर राजकीय नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावर अगदी मोजक्याच शब्दात माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मला काही बोलायचं नाही. मी त्याला फारसं महत्व देत नाही. ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात.” अशा मोजक्याच शब्दात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपा नारायण राणे यांच्या
वक्तव्याचं समर्थन करत नाही

राज्यात अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा नारायण राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही असंही ते म्हणाले आहेत. नारायण राणे यांना अटक केली तरी जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही. “बोलण्याच्या भरात कदाचित राणे साहेब ते बोलले असतील, ते वापरायचं त्यांच्या मनात असेल असं मला वाटत नाही. तथापि मुख्यमंत्री हे एक महत्त्वाचे पद आहे, त्या पदाबद्दल बोलत असतांना संयम बाळगणे आवश्यक आहे,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

काय साधा माणूस वाटलो
का : नारायण राणे

माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं असून मी काय साधा माणूस वाटलो का अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पहा असंही यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला असून चिपळूणमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नारायण राणे यांचे निवासस्थानी
सेना-भाजप कार्यकर्त्यात राडा

रायगड येथील महाडमध्ये राणेंची जन आशिर्वाद यात्र पोहचली त्यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणेंनी मी असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य केल्याचं पहायला मिळालं. या वक्तव्यानंतर मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात शिवसेनेकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. राणे यांचे जुहू येथील बंगल्यावर युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. जुहू इथल्या नारायण राणे यांच्या घराबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आलेल्या मोठा गोंधळ उडाला आहे.

अफगाणिस्तानात युक्रेनच्या
विमानाचं अपहरण

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर तिथली परिस्थिती चिघळत चालली आहे. तालिबान आणि दहशतवाद हे समीकरण असल्याने अनेक देशांनी चिंता व्यक्त केली. आता अफगाणिस्तानात युक्रेनच्या विमानाचं अपहरण केल्याचं समोर आलं आहे. युक्रेनचं विमान आपल्या नागरिकांना आणण्यासाठी अफगाणिस्तानात गेलं होतं. या दरम्यान विमानाचं अपहरण झाल्याचं युक्रेनचे परराष्ट्रमंत्र्यांनी दावा केला आहे. TASS ने वृत्त दिलं आहे. विमान हामिद करजई विमानतळावर नागरिकांना घेण्यासाठी उतरलं होतं.

आरबीआयकडून सारस्वत
बँकेवर कारवाई

भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी धनलक्ष्मी बँकेला 27.5 लाखांचा दंड ठोठावला आहे. बँकेने ठेवीदारांसंदर्भात आखून देण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील पूर्वोत्तर आणि मध्यपूर्व रेल्वे कर्मचारी सहकारी बँकेवरही रिझर्व्ह बँकेने कारवाईचा बडगा उभारला आहे. या सहकारी बँकेने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 20 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.

राज्याच्या पोलीस
दलात मोठे फेरबदल

राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आलेत. भारतीय पोलीस सेवेतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या पदांसह पोलीस उपमहानिरीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या पदांवर बदल्या करण्यात आल्यात. बदली किंवा पदोन्नती असं या बदल्याचं स्वरुप आहे. अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या पदांसाठी 14 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात. पोलीस उपमहानिरीक्षक पदांसाठी 16 आणि विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या पदांवर 7 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.