उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती दौऱ्याला सुरुवात झालीय. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते बारामती नगरपरिषदेच्या कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन करण्यात आले. नव्याने बांधण्यात येणाऱ्या व्यावसायिक संकुलाची अजित पवार यांनी माहिती घेतली. तसेच काम दर्जेदार करण्याबाबत अधिकारी आणि ठेकेदारांना सूचना केल्या. यावेळी सहारा फाउंडेशनच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिलाई मशिन वाटपही करण्यात आलंय. मुस्लिम बँकेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार हेही उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, “गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचं संकट आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टींना मर्यादा आल्या आहेत. या काळातही विकास कामं सुरू आहेत. बारामतीत अनेक कामे सुरू आहेत. बारामतीकरांचं प्रेम, पाठिंबा आणि शरद पवार यांचे आशिर्वाद यामुळे हे सगळं होतंय. सच्चर कमिटीच्या अहवालामध्ये अनेक गोष्टी आल्या आहेत. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करु. मात्र, वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आल्यानंतर काही गोष्टी सबुरीनं घ्याव्या लागतात.”
“आम्हाला बारामतीकरांना भल्या सकाळी काम सुरू करायची सवय लागलीय. शरद पवार यांच्यामुळे ही सवय लागलीय. आता अनेकजण त्यामुळं थोडं दबकतात की हा बाबा कधी येईल याची शाश्वती नाही. मुद्दाम कुणाला तरी त्रास द्यायचा अशी भूमिका नसते. लवकर काम सुरू केलं की इतर कामांनाही वेळ देता येतो. बारामतीत आयुर्वेद महाविद्यालय होणार आहे. बारामतीकरांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
“महिलांना आरक्षण देण्यासाठी शरद पवार यांनीच पुढाकार घेतला. कोरोना काळात रोजगार अडचणीत आले आहेत. राज्य सरकारचं उत्पन्न साडेचारवरुन सव्वातीन लाख कोटींवर आलंय. पगार द्यावेच लागतात. कोरोना काळ आहे. काळजी घ्या. नियमांचं पालन करा,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.
(फोटो गुगल)