पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता आगामी युग हे इलेक्ट्रिक वाहनांचे असेल, अशी चर्चा हल्ली सर्रास कानावर पडते. भारतात आगामी दोन ते तीन वर्षांत इलेक्ट्रॉनिक कारचा वापर वाढल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर एकवेळ चार्ज करायला किती पैसे लागतात?
इलेक्ट्रॉनिक कार खरेदी करताना काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. तुमचे कार्यालय घरापासून किती दूर आहे किंवा इलेक्ट्रिक कारमधून बाहेरगावी किती अंतरापर्यंत प्रवास होऊ शकतो? चार्जिंगसाठी किती खर्च येणार, अशा सर्व घटकांचा विचार झाला पाहिजे.
मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी एका युनिटपाठी साधारण 15 रुपयांचा खर्च येतो. तर दिल्लीत वीज स्वस्त असल्याने प्रत्येक युनिटसाठी 4.5 ते 5 रुपयांचा खर्च येईल. याचा अर्थ दिल्लीत इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्यांना अवघ्या 120 ते 150 रुपयांत संपूर्ण गाडी चार्ज करता येईल.
एखादी कार संपूर्ण चार्ज होण्यासाठी साधारण 20 ते 30 युनिटस लागतात. याचा अर्थ प्रत्येकवेळी इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी तुम्हाला 200 ते 400 रुपयांचा खर्च येईल. तर इलेक्ट्रिक स्कुटर चार्ज करण्यासाठी 3 युनिट वीज लागते. त्यामुळे तुमची स्कुटर संपूर्णपणे चार्ज करण्यासाठी एकावेळेला साधारण 50 रुपयांचा खर्च येईल.
तुम्ही कार्यालायतून घरी आल्यानंतर कार चार्जिंग करायचा विचार करत असाल तर तुम्हाला वाट पहावी लागू शकते. 15 एमपीच्या एसी चार्जरने तुम्ही गाडी चार्ज करायला गेलात तर त्यासाठी नऊ तास लागतील. तर फास्ट डीसी चार्जरचा वापर केल्यास एका तासात 80 टक्के गाडी चार्ज होते. शेवटची 20 टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी जास्त वेळ लागतो.
तुम्हाला इलेक्ट्रिक कार घेण्याची कितीही इच्छा असली तरी त्याची किंमत हा कळीचा मुद्दा आहे. सुरुवातीच्या काळात तरी इलेक्ट्रिक वाहने ही अन्य वाहनांपेक्षा 20 ते 30 टक्क्यांनी महाग असतील. मात्र, ऑपरेटिंग कॉस्ट बघता इलेक्ट्रिक वाहनेही हा चांगला पर्याय आहे. इलेक्ट्रिक कारने एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तुम्हाला 1.2 ते 1.4 रुपये इतका खर्च येतो. तर पेट्रोलच्या गाडीसाठी प्रतिकिलोमीटर खर्च नऊ रुपये इतका आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक कारने महिन्यात 800 किलोमीटर प्रवास केला तरी 640 रुपये खर्च येईल. याऊलट पेट्रोल-डिझेलच्या वाहनाचा महिन्याचा खर्च 7200 रुपये इतका आहे.
(फोटो गुगल)