अफगाणिस्तानात उद्भवलेल्या भयावह परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. आदित्य ठाकरे यांनी अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिलं आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्याच्या नेतावाईकांशी संपर्क करुन देण्याबाबतचे आश्वासनही आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. अफगाणी विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरेंनी भेटीची वेळ दिल्यामुळे आभार व्यक्त केले आहेत. तसेच विद्यार्थ्यांचा व्हिसा संपत आलाय तसेच विद्यार्थी भयभीत असल्याचेही सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत मांडल्या आहेत.
महाराष्ट्रात या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची तर आम्ही काळजी घेऊच. शिवाय त्यांची समस्या केंद्र सरकारपर्यंतही पोहोचवू, असे आश्वासन यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले. अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीमुळे या विद्यार्थ्यांचा आपल्या नातेवाईकांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी भयभीत झाले आहेत. या विद्यार्थ्यांना दिलासा देऊन त्यांना परराष्ट्र मंत्रालयामार्फत नातेवाईकांशी संपर्क करुन देणे तसेच महाराष्ट्रात या अफगाणी विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्याबाबत आदित्य ठाकरे आणि विद्यार्थ्यांमध्ये आज बैठक झाली आहे.
अफगाणिस्तानातून महाराष्ट्रात आलेल्या आमच्यासारख्या जवळपास चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना मदतीची गरज आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती पाहता आम्हाला भारताने आश्रय दिला पाहिजे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे यांच्या भेटीदरम्यान केली. तालिबानला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. पाकिस्तानच्या पाठिंब्यामुळेच तालिबानने अफगाणिस्तानात प्रवेश केला. आम्ही आदित्य ठाकरे आणि सरकारचे आभारी आहोत. त्यांनी आमच्यासाठी वेळ काढला, आमच्या समस्या ऐकल्या. आमचे कुटुंब अफगाणिस्तानात अडकून पडले असून त्यांना सुरक्षा मिळवून द्या, यावेळी केल्याचे या विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. अफगाणी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. काही विद्यार्थ्यांचा व्हिसा संपत आहे, तर काही विद्यार्थ्यांचा व्हिसा अजून दोन-तीन वर्षांसाठी आहे. व्हिसाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करु. केंद्र सरकारपर्यंत या विद्यार्थ्यांचे प्रश्न पोहोचवणार आहे. साडेतीन ते चार हजार अफगाणी विद्यार्थी महाराष्ट्रात आहेत,असे त्यांनी सांगितले.