पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविकेचा डेंग्यूमुळे मृत्यू

पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविकेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नगरसेविका अर्चना तानाजी बारणे यांचे मंगळवारी उपचारादरम्यान निधन झालं. पिंपरीतील खासगी हॉस्पिटलमध्ये अर्चना बारणे यांच्यावर उपचार सुरु होते.

अर्चना बारणे यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली होती. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. उपचारादरम्यान बारणेंच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास अर्चना बारणे यांची प्राणज्योत मालवली. थेरगावमधील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अर्चना बारणे पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड महापालिकेतून भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या. प्रभाग क्रमांक 23, शिवतीर्थनगर, समर्थनगर, केशवनगरमधून त्या नगरसेवक झाल्या होत्या. बारणेंनी स्थायी समितीचे सदस्यत्व आणि ‘ग’ प्रभाग कार्यालयाचे अध्यक्षपदही भूषवले होते. कोरोना संसर्गाच्या काळात त्यांनी आपल्या प्रभागात मोठे मदतकार्य केल्याचे बोलले जाते.

नगरसेविका अर्चना बारणे यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना नगरसेविकेच्याच जीवावर बेतल्याने पालिका प्रशासनाच्या हलगर्जीवरही बोट ठेवले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.