जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात बिबट्या फिरताना आढळून आला आहे. हा बिबट्या लेणी परिसरात फिरताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये वाकला येथे आणखी एका बिबट्याने नागरिकांवर हल्ला केला आहे. एकाच दिवसात या दोन घटना घडल्यामुळे औरंगाबादेत खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेण्या या जगप्रसिद्ध आहेत. या लेण्या पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे लेणी पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र, लेणीच्या परिसरात अचानकपणे बिबट्या दिसला असून त्याचा वावर सीसीटीव्हीत कैद करण्यात आला आहे. यापूर्वी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये गर्दी नसल्यामुळे या बिबट्याने लेणी परिसरात ठाण मांडले आहे. हा बिबट्या अजिंठा लेणी तसेच लेणी समोरील जागेत दिसून आलाअसून अचानकपणे दिसलेल्या बिबट्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
एकीककडे अजिंठा लेण्यामध्ये बिबट्या फिरत असल्याचे समोर आले असून दुसरीकडे वैजापूर तालुक्यातही बिबट्याने नागरिकांवर गंभीर हल्ला केला आहे. या हल्ल्यात तालुक्यातील वाकला येथील दोन नागरिक जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या नागरिकांवर लोणी खूर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार करण्यात आले. अचानकपणे बिबट्याने हल्ला केल्यामुळे वाकला गावाच्या परिसरात सध्या भीतीचे वातावरण आहे.