सलमान खानच्या गर्लफ्रेंडची यादी तशी खूप लांब लचक आहे. तथापि, जेव्हा जेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल बोलले जाते, तेव्हा निश्चितपणे एक नाव समोर येते आणि ते आहे अभिनेत्री सोमी अली. सोमी अली परदेशातून भारतात केवळ सलमान खानशी लग्न करण्यासाठी आली होती. पण तिचे हे स्वप्न अपूर्णच राहिले.
सोमीने काही काळापूर्वी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, सलमान खानने तिची फसवणूक केली आहे, त्यामुळे तिने सलमानसोबतचे संबंध तोडले. दरम्यान, सोहेल खान याचा एक जुना व्हिडीओ सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये तो सांगत आहेत की, सोमी अलीने सलमान खानला त्याच्यामुळे सोडले होते. हा जरासा मजेदार किस्सा आहे. मात्र, यात किती सत्य आहे, याची खात्री नाही.
एकदा सोहेल खान कलर्स टीव्हीच्या ‘एंटरटेनमेंट नाईट’ नावाच्या कॉमेडी शोमध्ये आला होता. या शोमध्ये सोहेलला त्याच्या लग्नाबद्दल विचारले गेले होते. त्याच्या लग्नाचा किस्सा सांगण्यापूर्वी, त्याने म्हटले की माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली, तेव्हाच सलमान खानची मैत्रीण त्याला सोडून गेली.
सोहेल म्हणाला, ‘मी नाव घेणार नाही, पण त्यावेळी सलमान भाई कुणालातरी डेट करत होते. तिने सलमान भाईला सोडले आणि संतापून निघून गेली. जाता जाता म्हणाली की, धाकटा भाऊ लग्न करत आहे आणि हा मोठा भाऊ करत लग्नाचं नावच घेत नाहीये.’ सोहेलचे हे बोलणे ऐकून असे वाटते की, तो सोमी अलीबद्दल बोलत आहे. सोहेलचे लग्न 1998 साली झाले होते आणि सोमी अलीने त्याचवेळी सलमान खानबरोबर ब्रेकअप केला होता.