पंतप्रधान जनधन खाते योजनेचे फायदे जाणून घ्या

सरकारने आपल्या आर्थिक हिताच्या बऱ्याच योजना लागू केल्या आहेत. विविध बँकांच्या माध्यमातून आपण अशा योजनांचा लाभ घेऊ शकतो. पण अनेकदा आपल्याला विविध योजनांची पुरेशी कल्पना नसते. त्या योजनेचे फायदे काय आहेत, योजनेचा लाभ कशा प्रकारे घ्यायचा, आदी विविध प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नसतात. त्यामुळे सरकारकडून विविध हिताच्या योजना राबवल्या गेल्या असतानाही आपण त्या योजनांचे लाथार्थी बनत नाहीत.
पंतप्रधान जनधन खाते योजनाही अशाच प्रकारची एक योजना आहे, ज्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला बरेच आर्थिक लाभ मिळू शकतील. बँकेमध्ये हे खाते उघडल्यास आपल्याला दोन लाखांपर्यंत विमा संरक्षणही मिळते. तसेच इतर विविध फायदे घेता येऊ शकतात.

देशात बँकिंग सुविधा अधिकाधिक ग्राहककेंद्री बनवण्याच्या हेतूने केंद्र सरकारने 2014 मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली होती. प्रत्येक परिवाराचे कमीत कमी एक बँक खाते असावे हासुद्धा एक उद्देश सरकारने डोळ्यासमोर ठेवला होता. गोरगरीब तसेच वंचित घटकांना सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिली जाणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावी, हेही या योजनेमागील एक प्रमुख कारण होते. या योजनेंतर्गत आतापर्यंत तब्बल 42 कोटींहून जनधन बँक खाती उघडली गेली आहेत. या योजनेची सर्वात मोठी खासियत ही आहे की, रक्कमेशिवाय आणि कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे कोणतीही व्यक्ती बँकेत आपले खाते उघडू शकते. तसेच हे बँक खाते उघडल्यानंतर दोन लाखांपर्यंतचा अपघाती विम्याचे संरक्षण कवचही लागू होते. हे खाते उघडण्यासाठी केवळ आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्राची गरज असते. जर तुमच्याजवळ आधार कार्ड असेल तर तुम्हाला दुसरे कुठलेही कागदपत्र सादर करण्याची गरज नसते.

जनधन खात्याबरोबरच खातेधारकाला रुपे डेबिट कार्डही दिले जाते. या कार्डवर सुरुवातीला एक लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जात होते. सरकारने 28 ऑगस्ट 2018 नंतर उघडल्या जाणाऱ्या जनधन खात्यांबरोबरच अपघाती अर्थात दुर्घटना विम्याची रक्कम वाढवून 2 लाख रुपये केली आहे. अर्थात खातेधारकाचा दुदैवाने अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला ही दोन लाखांची रक्कम विमा स्वरुपात मिळू शकते.
याशिवाय या खात्याबरोबर 30 हजार रुपयांचा जीवन विमाही असतो. खातेधारकाच्या मृत्यूनंतर वारस व्यक्तीला ही रक्कम मिळते. मात्र यासाठी दुर्घटना घडण्याच्या 90 दिवस आधी आपल्या खात्यातून किमान एकदा पैशांची देवघेव झालेली असली पाहिजे. तसेच विशेष फायदा म्हणजे तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्ही 10 हजार रुपयांपर्यंत पैसे काढू शकता. ज्या व्यक्तीचे खाते अ‍ॅक्टिव्ह असेल त्या व्यक्तीला सहा महिन्यानंतर या सुविधेचा लाभ घेता येतो. या खात्यातून देशात कुठेही, कुणालाही पैसे पाठवता येतात. तसेच सरकारी योजनांचे पैसे थेट या खात्यात जमा होतात. जनधन खातेधारक पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा वीमा योजना, अटल पेन्शन योजना आणि मुद्रा लोन योजनेसाठीही पात्र असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.