कोरोना विषाणू संसर्गामुळं सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डानं दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये वकील ममता शर्मा यांनी याचिका दाखल केली आहे. ममता शर्मा यांनी बारावीची परीक्षा रद्द करुन निकाल जाहीर करण्याची मागणी केलीय. बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी वस्तूनिष्ठ पद्धत अंमलात आणावी, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
सीबीएसई बोर्डानं मात्र बारावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबतच्या चर्चा फेटाळल्या आहेत. 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याविषयी कोणताही निर्णय झालेला नाही. बारावीच्या परीक्षा रद्द केल्या जातील या सर्व अफवा आहेत, असं सीबीएसई बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सीबीएसईनं या संदर्भात शुक्रवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. 12 व्या च्या परीक्षांबाबत जो निर्णय घेतला जाईल तो माध्यमांना अधिकृतरित्या कळवण्यात येईल, असंही सीबीएसईनं म्हटलं आहे.
सीबीएसई बोर्डानं विद्यार्थ्यांना अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं आहे. सीबीएसई बोर्ड विद्यार्थ्यांशी संबंधित माहिती अधिकृत वेबसाईटवर जाहीर करते. विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र सरकारनं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात या विरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. ही याचिका पुणे येथील प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी दाखल केली आहे. धनंजय कुलकर्णी यांनी राज्य सरकारच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करताना राज्यात दहावीचे अनेक बोर्ड आहेत, त्यापैकी केवळ एसएससी बोर्डाने परीक्षा रद्द केली आहे, असा दावा केला.