कोरोनाने क्रिकेटच्या मैदानातही एन्ट्री घेतल्याने आयपीएलचं 14 वं पर्व (IPL 2021) स्थगित करण्यात आलं. पर्व जरी स्थगित करण्यात आलेलं असलं तरी खेळाडू प्रेक्षकांना आयपीएलची वारंवार आठवण येत आहे. इंग्लंडचा धडाकेबाज खेळाडू जॉस बटलरने भारताविषयी, इथल्या लोकांविषयी एक खास पोस्ट लिहून त्यांचे आभार मानले आहेत. तसंच सद्यस्थितीतून भारत लवकर पूर्वपदावर यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
जॉस बटलरसाठी आयपीएलचं 14 वं पर्व खास
राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या जॉस बटलरसाठी आयपीएलचं 14 वं पर्व खूप खास राहिलं. त्याने आपल्या कुटुंबासह आयपीएलचे दिवस खूप इन्जॉय केले. जॉसच्या लेकीचा वाढदिवसही राजस्थानच्या सर्व संघ सहकाऱ्यांनी मोठ्या दिमाखात साजरा केला. या सगळ्या आठवणीने जॉस भावूक झाला. म्हणूनच लेकीच्या वाढदिवसाचे सुंदर फोटो शेअर करत भारत देश खूप खास असल्याचं जॉस म्हणाला.
आयपीएलचं 14 वं पर्व स्थगित झाल्यानंतर जॉस बटलरने एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्याने भारताविषयी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. “भारत हा खूप खास देश जो सध्या कठीण परिस्थितीतून जातोय. माझं आणि माझ्या कुटुंबाचं स्वागत करण्यासाठी मी तुमचा आभारी आहे, जसं स्वागत तुम्ही नेहमी करता. सुरक्षित रहा, आपली काळजी घ्या”, असं आपल्या ट्विटमध्ये जॉस बटलरने म्हटलंय.