32 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मोदींनी अयोध्येत….काय झालं होतं या दिवशी?
अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरु असून २२ जानेवारी रोजी इथं रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. देशभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जावा असं आवाहन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. हे मंदिर उभं राहावं यासाठी अनेक साधू-संतांसह अनेकांना निर्धार केले होते. काहींनी मंदीर होईपर्यंत लग्न न करण्याचे, काहींनी चप्पल न घालण्याचे, तर काहींनी न बोलण्याचे प्रण केले होते. अशातच ३२ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत जय श्री रामच्या घोषणा देत मंदिर बनल्यानंतर तिथे परत येण्याचा निश्चय केला होता.
इतिहासाची पाने पाहिली तर आजपासून ३२ वर्षांपूर्वी याच दिवशी नरेंद्र मोदी दुपारी अयोध्येतील राम मंदिराच्या ठिकाणी पोहोचले होते. एकतेचा संदेश देण्यासाठी ते कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत एकता यात्रेवर होते.
नरेंद्र मोदी अयोध्येला पोहोचले तेव्हा त्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा देत राम मंदिर बांधल्यानंतरच येथे परतणार असल्याची शपथ घेतली. अगदी तसेच घडले. राम मंदिराची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली होती. आता प्राणप्रतिष्ठाही त्यांच्या हस्ते होणार आहे.
15 मार्चपर्यंत सैन्य परत बोलावून घ्या; मालदीव सरकारची भारताला डेडलाईन
चीनच्या दौऱ्यावरुन परत आलेले मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू हे भारताविरोधात कठोर होताना दिसत आहेत. मुइझू यांनी मालदीवमधील भारतीय सैन्य परत बोलवण्याचा जुना राग पुन्हा छेडला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विषयी मालदीवमधील तीन उपमंत्र्यांनी अवमानकारक भाषा वापरली होती. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंधांत तणाव निर्माण झाला आहे.मुइझू सरकारने मालदीवमधील भारतीय सैन्य परत बोलवण्याचा प्रस्ताव भारताकडे पाठवला आहे. मालदीवने भारताला १५ मार्चपर्यंतचा वेळ दिला आहे. मुइझू ५ दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली होती. चिनी पर्यटकांनी मालदीवमध्ये मोठ्या प्रमाणात यावं असं आवाहन यावेळी मुइझू यांनी केलं होतं.
शीतलहरीमुळे पंजाबमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
‘कोल्ड वेव्ह’मुळे पंजाबमधील सर्व शाळांमधील इयत्ता 5 वी पर्यंतचे वर्ग 20 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येतील तर इयत्ता 6 वी ते 12वी चे वर्ग सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत होतील.
मोदींचा साऊथ लूक, लुंगी परिधान करुन पोंगलमध्ये घेतला सहभाग!
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दिल्लीतील राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या निवासस्थानी पोंगल उत्सवात सहभागी झाले. यावेळी ते दक्षिण भारतीय पारंपारिक वेशभूषेत दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी एक विधी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या कोटसह पांढऱ्या रंगाची लुंगी घातल्याचे व्हिडिओ व्हायरल होतांना दिसत आहे.
काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री स्वगृही परतणार? भाजपकडून ‘या’ बड्या नेत्याला ऑफर!
गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर स्वगृही परतणार असल्याची चर्चा रंगली आहे. शेट्टर यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी भाजप नेत्यांनीच पुढाकार घेतल्याचीही चर्चा सुरू आहे. शेट्टर यांची मनधरणी करण्यासाठी भाजप नेत्यांची एक टीम पुढे आली आहे.
रामायण मालिकेतील राम अयोध्येत पोहचले, विमानतळावरील स्वागतानं भारावले!
टीव्ही मनोरंजन विश्वात ज्या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ घर केले त्या रामायण मालिकेतील कलाकारांना देखील या सोहळ्यासाठी बोलवण्यात आले आहे. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील प्रभु श्रीराम यांची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल यांचा एक व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. अरुणजी हे अयोध्येत दाखल झाले आहेत.
गोविल यांनी अयोध्या विमानतळावर आल्यानंतर त्यांचे ज्या उत्साहात स्वागत झाले तो भावूक प्रसंग सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यात उपस्थित प्रेक्षकांनी, प्रवाशांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. एका प्रवाशानं तर चक्क त्यांच्या पाया पडून त्यांना अभिवादनही केले. यात अरुणजी हे कमालीचे भावूक झाल्याचे दिसून आले.
‘ओपेनहायमर’नं शाहरुखच्या ‘जवान’ अन् ‘पठाण’ला टाकलं मागे!
सध्या ८१ व्या गोल्डन ग्लोब पुरस्काराची चर्चा आहे. त्यात ओपेनहायमरनं त्याच्या नावावर कित्येक पुरस्कार केले आहेत. सोशल मीडियावर ओपेनहायमरच्या नावाची चर्चा आहे. नेटकऱ्यांकडून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येताना दिसत आहेत. अशातच आयमॅक्सच्या त्या यादीत ओपेनहायमरनं पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यानं पठाण आणि जवानला मागे टाकलं आहे.
आयएमएएक्सच्या त्या यादीनुसार, भारतातील टॉप १० सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेतील चित्रपटांमध्ये देखील ओपेनहायमर हा चित्रपट आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यानंतर शाहरुखच्या पठाण आणि जवानचा क्रमांक आहे. आयएमएएक्सच्या थिएटरमधून ६.१३५ मिलियन युएसडी अंदाजे ५०.८४ कोटींची कमाई झाली आहे. त्यात एकट्या ओपेनहायमरचा वाटा हा २५ ते ३० टक्के एवढा आहे.
‘मणिपूरचे अश्रू पुसण्यासाठी पंतप्रधान मोदी का नाही आले?’ सरकारला लक्ष्य करत भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमधील थौबल येथून आज सुरूवात झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी राष्ट्रध्वज दाखवून यात्रेला सुरूवात करण्यात आली. यावेळी आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. “२९ जून २०२३ रोजी मी मणिपूरला आलो होतो. त्यावेळी मी जे काही पाहिले, जे काही ऐकले. ते त्याआधी कधीच एकले किंवा पाहिले नव्हते. २००४ पासून मी राजकारणात आहे. पण त्यावेळी मी जे पाहिले, ते मणिपूर याआधी नव्हते. पण तरीही आजवर पंतप्रधान याठिकाणी लोकांचे अश्रू पुसण्यासाठी आलेले नाहीत. कारण त्यांना आणि भाजपाला मणिपूरशी काहीही देणेघेणे नाही. तुमचे दुःख त्यांचे दुःख नाही”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
भारतात निश्चित लक्ष्याच्या तुलनेत जलविद्युत निर्मिती कमी!
देशात कोळशावर आधारित औष्णिक आणि आण्विक वीजनिर्मितीने निश्चित लक्ष्य गाठले असले तरी जलविद्युत निर्मिती मात्र कमी झाली आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या गेल्या नऊ महिन्यांच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३ दरम्यानच्या अहवालानुसार, देशात औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी वरील कालावधीत ९ लाख ८३ हजार ४८ दशलक्ष युनिट वीजनिर्मितीचे लक्ष्य दिले होते. परंतु ९ लाख ८० हजार ५३८.२३ दशलक्ष युनिट वीज निर्माण झाली. ही लक्ष्याच्या तुलनेत ९९.७४ टक्के होती. गेल्यावर्षी या काळात देशात ८ लाख ९२ हजार ८९.६६ दशलक्ष युनिट वीज निर्माण झाली.
जोकोविच वर्चस्व राखणार? ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून सुरुवात
चार प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या या वर्षांच्या हंगामाला सुरुवात होणार आहे. राफेल नदालने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे २४ ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविच व युवा स्पेनच्या कार्लोस अल्कराझ यांमध्ये पुन्हा एकदा द्वंद्व पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जोकोविचला युनायटेड चषक स्पर्धेत सर्बियाकडून खेळताना मनगटाला दुखापत झाली होती. मात्र, आपण ठीक असल्याचे जोकोविचने सांगितले. उपांत्यपूर्व सामन्यात मनगटाला दुखापत झाल्याने त्याला सामन्यादरम्यान दोनदा वैद्यकीय मदत घ्यावी लागली व त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डि मिनाऊरकडून पराभूत व्हावे लागले होते.
भारतीयांमध्ये श्रीमंत होण्याच्या प्रमाणात वाढ, १० कोटी लोकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांच्या पुढे जाणार
भारतात श्रीमंत वर्गात झपाट्याने वाढ होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था जसजशी प्रगती करीत आहे, तसतशी भारतीयांची समृद्धीही वाढत आहे. येत्या काही वर्षात भारतातील श्रीमंत वर्ग झपाट्याने वाढणार असून, चांगली कमाई करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढणार आहे, असा विश्वास जागतिक बँकिंग समूह गोल्डमन सॅचने व्यक्त केला आहे.
गोल्डमन सॅचने शुक्रवारी यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला. ते म्हणाले की, येत्या तीन वर्षांत भारतातील समृद्ध लोकांची संख्या १०० दशलक्ष म्हणजेच १० कोटी होईल. रिपोर्ट तयार करताना गोल्डमन सॅक्सने अशा समृद्ध भारतीयांच्या श्रेणीतील लोकांना समाविष्ट केले होते की, ज्यांची वार्षिक कमाई १० हजार डॉलर्सपेक्षा जास्त असेल. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे ८ लाख ३० हजार रुपये होते.
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
भारतीय शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर सोमवारी (१५ जानेवारी) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.डॉ. प्रभा अत्रे यांचे शनिवारी (१३ जानेवारी) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अमेरिकस्थित त्यांची भाची सोमवारी पुण्यात आल्यानंतर अत्रे यांच्या पार्थिवावर दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी छत्रपती संभाजी उद्यानासमोरील स्वरमयी गुरुकुल या त्यांच्या निवासस्थानी सकाळी नऊ ते बारा या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर जंगली महाराज रस्त्यावरुन वैकुंठ स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा मार्गस्थ होईल, असे डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती यांनी कळविले आहे.
( छायाचित्र सौजन्य एबीपी )
SD Social Media
9850603590