आज भाजपचा 43 वा स्थापना दिवस आहे. स्थापना दिवसानिमित्त भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला आहे. आज भाजपचा स्थापना दिवस आहे. सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. समाजात मोठे परिवर्तन करण्याचे काम आपण करतोय, भाजप आज देशाच्या सर्व भागात जनतेचा पक्ष म्हणून काम करताना दिसतोय. उत्तर पूर्व भागातही भाजपचं सरकार स्थापन झालं आहे. एक नेता घर संसार सोडून 24 तास देशाचा विचार करत आहे. पक्षाबद्दल एक विश्वास लोकांच्या मनात तयार झाल्याचं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.
आणीबाणीच्या विरोधात लढा
पुढे बोलताना ते म्हणाले की, जनसंघांच्या रुपाने पन्नाशिच्या दशकात पहिल्यांदा पक्षाचा उदय झाला. आणीबाणी व अराजकतेविरोधात मोठा लढा जनसंघाने उभारला. हा लढा लढताना अराजकता पसरवणाऱ्या काँग्रेला दूर करण्यासाठी जनसंघातून भाजपचा जन्म झाला. पहिले अधिवेशन झाले तेव्हा अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते, अंधेरा छटेगा , कमल खिलेगा पण तेव्हा फक्त दोन खासदार होते. कोणालाही विश्वास नव्हता, आज मात्र भाजप हा सर्वात मोठा पक्ष बनला आहे.
‘मोदींना जागतिक नेता म्हणून मान्यता’
आज देशात परिवर्तन घडत आहे. आज जागतिक नेता म्हणून मोदींना मान्यता मिळाली आहे. ते भारतामध्ये गरिबांचा मसिहा म्हणून बोलत असतात. गरिबाला घर, पाणी, वीज, अन्नधान्य आणि सर्व पायाभूत सुविधा मिळत आहेत. शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळत आहे, तरुणांना रोजगार मिळत असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.