पंतप्रधान कार्यालय हे निरुपयोगी आहे. देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी आता नितीन गडकरी यांच्यावर सोपविली पाहिजे, असे मत भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. भारताने मुस्लीम आक्रमक आणि ब्रिटीश साम्राज्यशाहीचे संकट ज्याप्रमाणे परतावून लावले तसेच कोरोनाच्या संकटानंतरही भारत तग धरून राहील. नियमांचे पालन न केल्यास भारताला कदाचित कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लढ्याची सूत्रे नितीन गडकरी यांच्याकडे सोपवायला हवीत. पंतप्रधान कार्यालयावर विसंबून राहणे, हे निरुपयोगी ठरेल, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोकळीक दिली आहे. मात्र, अतिनम्र स्वभावामुळे त्यांना ते सर्व निर्णय प्रभावीपणे राबवू शकत नाहीत. नितीन गडकरी त्यांच्या मदतीला आल्यास डॉ. हर्ष वर्धन अधिक खुलून काम करतील, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
नितीन गडकरींच्या नावाला अनेकांचा पाठिंबा
पंतप्रधान कार्यालय म्हणजे पंतप्रधान नाहीत हे लक्षात घ्यावं. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारणीची गरज लागेल. यामध्ये नितीन गडकरी यांनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे, असेही स्वामींनी म्हटले आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांच्या या प्रस्तावाचे ट्विटवरवर अनेकांनी स्वागत केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री असणारे नितीन गडकरी हे झपाट्याने काम करण्यासाठी ओळखले जातात. सध्याच्या घडीला ते मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लढ्याची सूत्रे नितीन गडकरींकडे सोपवणार का, हे पाहावे लागेल.