स्टिंग ऑपरेशनमुळे चेतन शर्मा अडचणीत? बीसीसीआय घेऊ शकते मोठा निर्णय
भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. चेतन शर्मा त्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे संघ निवडीच्या मुद्द्यांवर बोलताना दिसत आहेत. चेतन शर्मा यांनी विराट कोहली आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील वादावरही बरंचसं वक्तव्य केलं आहे. या स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्मा वादात अडकले असून बीसीसीआय लवकरच त्यांच्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते.बीसीसीआयकडून चेतन शर्मांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देऊ शकते, त्यानंतर पुढच्या कारवाईवर निर्णय होण्याची शक्यता आहे. आता प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी संघाची घोषणा होण्याआधी त्यांना पुढच्या निवड समितीच्या बैठकीत बीसीसीकडून चेतन शर्मांना सहभागी होण्याची संधी दिली जाईल की नाही. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकल्याने चेतन शर्मांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. तसंच याचा भारतीय संघ आणि सिलेक्टर्स यांच्यातील संबंधावर वाईट परिणाम होऊ शकतो.
कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात अखेर गिरीश बापट यांची एन्ट्री
प्रकृती अस्वस्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून दूर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट हे अखेर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार गिरीश बापट व्हिलचेअरवर सहभागी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच गिरीश बापट यांनी तब्येत ठीक नसल्याचे कारण देत कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई सुरु असल्याने गिरीश बापट आजारपण बाजुला सारून आपल्या पक्षासाठी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.
स्वरा भास्करच्या आयुष्यात राजकीय एंट्री; ‘या’ नेत्याशी गुपचूप उरकलं लग्न
बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या अभिनयापेक्षा वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असते. राजकीय घडामोडींवर ती नेहमी भाष्य करत असते. ट्विटर वरून वेळोवेळी निशाणा साधत असते. तिने काहीच चित्रपटात अभिनय केला असला तरी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. मध्यंतरी ती राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याने चर्चेत आली होती. बऱ्याच काळापासून ती चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. मात्र आता ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. स्वरा भास्करने नुकतंच लग्न केल्याची घोषणा केली आहे.
स्वरा भास्कर अनेकदा तिच्या राजकीय विचारांमुळे चर्चेत असते, पण आता तिच्या आयुष्यात ‘राजकीय एंट्री’ झाली आहे. स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले आहे. स्वरा या वर्षाच्या सुरुवातीला ६ जानेवारीलाच विवाहबद्ध झाली होती. काही काळापूर्वी स्वराने स्वतःचा आणि फहादचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, पण या फोटोत दोघांचेही चेहरे दिसत नव्हते. पण आता स्वराने जानेवारीत झालेल्या लग्नाची घोषणा केली आहे.
मंत्री सिंधियांची बॅटींग पडली भाजप कार्यकर्त्याला महागात
मध्य प्रदेशातील रीवा येथे केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. दरम्यान त्यांच्यासाठी असलेल्या कार्यकर्त्यांनी फिल्डींगसाठी तयारी दर्शवत मैदान जोरदार सजले. परंतु मंत्री सिंधिया शानदार फलंदाजी करत असताना अचानक एक घटना दुर्घटना घडली.
सिंधियाच्या बॅटने जोरदार मारलेला चेंडू भाजप कार्यकर्त्याच्या थेट डोक्यात जाऊन लागला. दरम्यान जखमी अवस्थेतील कार्यकर्त्याला तातडीने संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान मागच्या काही दिवसांपासून रीवा भागात दौऱ्यावर असताना ही घटना घडली. मध्यप्रदेशमधील विंध्य येथे विमानतळाची पायाभरणी करताना दोन्ही नेते रीवा येथे उपस्थित होते. त्यानंतर नव्याने बांधलेल्या स्टेडियमचेही उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया क्रिकेट खेळत असताना ही घटना घडली.
पाण्याच्या टाकीजवळ कपडे धुण्यावरून वाद, लष्कराच्या जवानाची हत्या; नगरसेवकासह 6 जण अटकेत
तमिळनाडूतील कृष्णगिरी येथे पाण्याच्या टाकीजवळ कपडे धुण्यावरून झालेल्या वादातून भारतीय लष्कराच्या एका 28 वर्षांच्या जवानाला सत्ताधारी डीएमकेचे नगरसेवक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून जोरदार मारहाण केली. `पीटीआय`च्या वृ्त्तानुसार, कृष्णगिरी येथे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या एका नगरसेवकानं आणि त्याच्या साथीदारांनी भारतीय लष्करातील ज्या जवानाला मारहाण केली होती, त्याचा बुधवारी (15 फेब्रुवारी) मृत्यू झाला आहे. या प्रकरणी डीएमकेच्या नगरसेवकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लान्सनायक एम. प्रभू यांच्यावर पक्षाच्या चिन्नास्वामी नावाच्या नगरसेवकासह त्याच्या साथीदारांनी पाळत ठेवून हल्ला केला. प्रभू यांना जोरदार मारहाण करण्यात आली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जवानास रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. पण बुधवारी (15 फेब्रुवारी) त्यांचा मृत्यू झाला.
आता ‘या’ दिवशी साजरा होणार ‘पठाण डे’! 500कोटींच्या कमाईनंतर तिकिटही केलं स्वस्त
शाहरुख खाननं 4 वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं आहे. त्याचा पठाण हा सिनेमा रिलीज झाला आणि काही दिवसातच सिनेमानं जगभरात 1000 कोटी रुपये कमावले. देशात पठाणनं 500 कोटींचा आकडा पार केला आहे. शाहरुख खान आणि यशराज फिल्सच्या बॅरनखाली तयार झालेल्या या सिनेमानं नवीन रेकॉर्ड तयार केला. हा सिनेमा लवकरच बाहुबली सिनेमाचा रेकॉर्डही तोडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 1000 कोटींची कमाई केल्यानंतर सिनेमा अजूनही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जबरदस्त आयडिया चालवण्यात येत आहेत. आता केवळ 110 रुपयात पठाण थिएटरमध्ये पाहाता येणार आहे.शाहरुखचा पठाण हा सिनेमा 25 जानेवारीला रिलीज झाला. सिनेमानं पहिल्याच दिवशी 40 कोटींचा गल्ला जमवला होता. सिनेमा रिलीज होण्याआधीच हाऊसफुल्ल झाला होता. आता 17 फेब्रुवारीला चक्क पठाण डे घोषित करण्यात आला आहे. या दिवशी पीव्हीआर, सिनेपोलिस, आयनॉक्स सारख्या ठिकाणचे तिकिटांचे दर घटवण्यात आलेत. या ठिकाणी केवळ 110 रुपयांना पठाणचं तिकिट विकत घेता येणार आहे. पठाण 500 कोटींची कमाई केल्याच्या आनंदात ही ऑफर जारी करण्यात आली आहे.
‘काँग्रेसचं खरं नाही, अशोक चव्हाणांनी विचार करावा’, भाजपची खुली ऑफर!
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील, अशा चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे 11 आमदार गैरहजर होते, त्यातही अशोक चव्हाणांचं नाव होतं, तेव्हाही अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा झाल्या, पण अशोक चव्हाणांनी या चर्चा फेटाळून लावल्या.
आता भाजपकडून अशोक चव्हाण यांना खुली ऑफर देण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाणांना ही ऑफर दिली आहे. काँग्रेसचं काही भविष्य राहिलं नाही, अशोक चव्हाणांनीही आता विचार करायला हवा, असं मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. अशोक चव्हाण सक्षम नेते आहेत, तसंच जगाने मोदींचं नेतृत्व स्वीकारलं आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला, भर रस्त्यात बेसबाल स्टिकने कार फोडली
भारतीय संघाचा खेळाडू पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत कारवर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पृथ्वी शॉने सेल्फी काढायला नकार दिल्याने आठ जणांच्या जमावाने त्याच्या कारवर बेसबॉल स्टीकने हल्ला केला. मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे.
पृथ्वी शॉ आपल्या मित्राच्या कारमध्ये बसला होता. त्यावेळी तिथे काही जण पृथ्वी शॉ सोबत सेल्फी घेण्यासाठी आले. पण पृथ्वी शॉने नकार देताच त्यांनी रागाच्या भरात पृथ्वी शॉ बसलेल्या कारवर हल्ला केला. या प्रकरणी पृथ्वी शॉने ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
भाजप आणि शिंदे गटात पुन्हा नाराजीनाट्य, मुंबई विद्यापीठात घडला नवा प्रकार
मुंबई विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त सिनेटमध्ये सर्व सदस्य हे भाजपचे नियुक्त करण्यात आले आहेत. सिनेट सदस्य नियुक्तीमध्ये शिंदे गटाला डावलण्यात आल्यानं शिंदे गट नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री असतानाही शिंदे गटाच्या एकाचीही सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली नाहीये. मुंबई विद्यापीठातील राज्यपाल नियुक्त सिनेटमध्ये दहावे सदस्य म्हणून धनेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी भाजपशी संबंधित नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता दहाव्या सदस्यपदी देखील भाजपच्या पदाधिकाऱ्याचीच नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना देखील मुंबई विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त सिनेटच्या सदस्य नियुक्तीमध्ये शिंदे गटाला डावलण्यात आल्यानं शिंदे गट नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई विद्यापीठातील राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्यपदी दहावे सदस्य म्हणून धनेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी देखील नऊ सदस्य हे भाजपशीच संबंधित आहेत.
कोर्टात सुनावणीनंतर ठाकरे गटाचे नेते सुखावले
राज्याच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे. शिवसेनेकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. त्यामुळे सेनेचे नेते प्रचंड आशावादी झाले आहे. तर शिंदे गटाच्या नेत्यांनीही आपल्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही, असा दावा केला आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्या. पी.एस. नरसिंहा या ५ जणांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कोर्टातील सुनावणीनंतर कोर्टाबाहेर शिवसेना आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली.
‘आम्ही निर्णयाची प्रतिक्षा करत आहोत. आज युक्तिवाद पूर्ण झाला आहे. हे प्रकरण 7 खंडपीठाकडे जावं, अशी आमची मागणी आहे. नबाम रेबिया प्रकरणामध्ये योग्य सुनावणी झाली आहे. कपिल सिब्बल आणि सिंघवी यांनी चांगला युक्तिवाद केला आहे. त्यामुळे हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाईल, असा विश्वास परब यांनी केला.
इंग्लंडने पहिल्याच दिवशी डाव केला घोषित, बेन स्टोक्सचा ‘डाव’ न्यूझीलंडवर पडला भारी
इंग्लंडच्या संघाला कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने बॅझबॉल क्रिकेट शिकवलं आहे. इंग्लंड, पाकिस्तान असो की न्यूझीलंडमधील मैदान, सध्या इंग्लंडचा संघ तुफान फॉर्मात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटीतील पहिल्या सामन्यातही इंग्लंडच्या संघाचा फॉर्म बघायला मिळत आहे. इंग्लंडच्या संघाने पहिल्या दिवशी वेगाने धावा करत तिसऱ्याच सत्रात डाव घोषित केला.
न्यूझीलंडचा कर्णधार टीम साउदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. पहिलीच विकेट १८ धावांवर गेली. त्यानतंर दुसऱ्या जोडीने चांगली भागिदारी केली. पुढच्या फलंदाजांनीही लहान मोठ्या भागिदारी करत संघाच्या धावसंख्येत भर घातली.
इंग्लंडने पहिल्या दिवशी ५८.२ षटके खेळताना ९ बाद ३२५ धावांवर डाव घोषित केला. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला इंग्लंडला चार धक्के बसले आणि ९ वा गडी बाद होताच कर्णधार बेन स्टोक्सने डाव घोषित केला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी बेन स्टोक्सने घेतलेला हा निर्णय धाडसी असल्याचं म्हटलं जातंय.
तिसऱ्या सत्रात डाव घोषित करण्यामागे इंग्लंडची रणनिती अशी होती की, नव्या चेंडूने कमी प्रकाशात वेगवान गोलंदाजांच्या मदतीने विकेट घेता येतील. इंग्लंडचा हा डाव त्यांच्या पथ्यावर पडला असून दिवसअखेर न्यूझीलंडची अवस्था ३ बाद ३७ अशी झाली. टॉम लॅथम, केन विल्यम्सन आणि हेन्री निकोलस इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर टिकू शकले नाहीत.
दिप्ती शर्माने भुवी, चहलला टाकले मागे; टी20 मध्ये केला खास विक्रम
भारतीय महिला क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कपमध्ये सलग दुसरा सामना जिंकला. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात अष्टपैलू क्रिकेटर दिप्ती शर्माने वेस्ट इंडिजच्या फलंदाजीला खिंडार पाडले. यामुळे वेस्ट इंडिजला 118 धावांवर रोखता आलं.
वेस्ट इंडिजच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिप्ती तिच्या अष्टपैलू खेळीसाठी ओळखली जाते. तिने वेस्ट इंडिजविरुद्ध महत्त्वाच्या विकेट घेतल्या. तिने 3 विकेट घेताना मोठा विक्रमही केला आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये तिने अशी कामगिरी केलीय जी भारतीय पुरुष संघाचे स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल यांनाही करता आलेली नाही.दिप्ती शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 88 सामने खेळले आहेत. यात तिने 100 विकेट घेण्याची कामगिरी केलीय. वेस्ट इंडिंजविरुद्ध ३ विकेट घेत पूनम यादवला मागे टाकलं. तर पुरुष क्रिकेट संघात भुवनेश्वर कुमारने 87 सामन्यात 90 विकेट घेतल्या आहेत तर दुसऱ्या स्थानी असलेल्या चहलने 87 विकेट घेतल्या आहेत.
SD Social Media
9850 60 3590