संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण केलं. लोकसभेनंतर राज्यसभेमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. देशात काँग्रेसचं सरकार असताना कशाप्रकारे वेगवेगळ्या राज्यांची सरकारं पाडली गेली, हे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं आहे.
‘काँग्रेसच्या एका पंतप्रधानाने राष्ट्रपती राजवटीचा 50 वेळा वापर केला, त्यांनी याचं अर्धशतकच केलं, त्यांचं नाव होतं इंदिरा गांधी. केरळमध्ये स्थापन झालेलं डाव्यांचं सरकार पंतप्रधान नेहरूंना आवडत नव्हतं, म्हणून त्यांनी केरळचं सरकार पाडलं. आज तुम्ही तिकडे आहात, पण तुमच्यासोबत काय झालं ते आठवा,’ असं म्हणत पंतप्रधानांनी डाव्यांनाही टोला हाणला.
मी शरद पवारांना कायमच आदरणीय नेते मानतो. 1980 मध्ये शरद पवारांचं वय 35-40 होतं. एक तरुण मुख्यमंत्री महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी निघाला होता. त्यांचं सरकारही पाडण्यात आलं. आज तेही तिकडे आहेत, असं शरद पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत असताना शरद पवार सभागृहात उपस्थित होते.
तामीळनाडूमध्ये एमजीआर आणि करुणानिधी यांचं सरकार काँग्रेसनं राष्ट्रपती राजवट लाऊन बरखास्त केलं. एमजीआर यांचा आत्मा वरून पाहत असेल, तुम्ही कुणाच्या बाजूने उभे आहात. एनटीआर यांच्यासोबत काय झालं? एनटीआर अमेरिकेमध्ये उपचारासाठी गेले होते, तेव्हा त्यांचं सरकार पाडण्यात आलं. प्रत्येक प्रादेशिक नेत्याला काँग्रेसने त्रास दिला आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना केला.