‘जय जय महाराष्ट्र माझा’ आता राज्यगीत; गाण्याच्या दोन कडव्यांचा मंत्रिमंडळाकडून स्वीकार

कविवर्य राजा बढे लिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतामधील दोन कडव्यांना महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून हे गीत अंगीकारण्यात येणार आहे. राज्यगीतावेळी औचित्यपालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही तयार करण्यात आल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अद्याप शासनामार्फत राज्यगीत तयार करण्यात आले नाही किंवा कोणत्याही गीतास तसा दर्जा देण्यात आलेला नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून हे १.४१ मिनिटांचे आहे. याला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला असला तरी राष्ट्रगीताचा मान-सन्मान, प्रतिष्ठा सर्वोच्च राहील. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात राज्यगीताचे ध्वनिमुद्रित किंवा स्वतंत्रणपणे वादन करावे. एक मे रोजी महाराष्ट्रदिनी राष्ट्रगीत झाल्यावर राज्यगीत होईल. राज्यातील शाळांमध्ये दैनंदिन सत्र सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत, परिपाठ, प्रार्थना याबरोबर राज्यगीतही वाजविले किंवा गायले जावे. सर्व शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, खासगी संस्था यांनीही राज्यगीताचा सन्मान ठेवून ते वाजविण्यास किंवा गाण्यास मुभा देण्यात आली आहे. हे गीत सुरु असताना लहान बालके, गरोदर महिला, आजारी व्यक्ती, दिव्यांग, वृध्द यांना उभे राहण्यातून सूट देण्यात आली आहे. पोलिस बँडकडूनही ते वाजविले जाईल, अशा सूचना राज्य सरकारने जारी केल्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.