आज दि.१६ जानेवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

महाविकासआघाडीचा घोळ, फक्त काँग्रेसच नाही तर ठाकरेंचाही ‘गेम’ झाला!

सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे. महाविकासआघाडीमध्ये काँग्रेसने नाशिकची जागा मागून घेतली आणि सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली, पण सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे पूत्र सत्यजीत तांबे रिंगणात उतरले, पण काँग्रेसचा एबी फॉर्म नसल्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून अर्ज करावा लागला.सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडामुळे काँग्रेसवर तर नामुष्की ओढावली, पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातीही काहीच लागलं नाही. महाराष्ट्रात विधानपरिषदेसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांवर मतदान होणार आहे, पण यातल्या एकाही जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार नाही.

नाशिकमध्ये तांबे चकाकणार? पदवीधर मतदारसंघाच्या सदस्य नोंदणीचा ग्राऊंड रिपोर्ट!

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे. काँग्रेसने उमेदवारी घोषित करून आणि एबी फॉर्म देऊनही सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा अर्ज दाखल केला. सत्यजीत तांबे यांच्याकडे अर्ज दाखल करताना काँग्रेसचा एबी फॉर्म नसल्यामुळे ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले.दुसरीकडे भाजपनेही कोणत्याच उमेदवाराला एबी फॉर्म दिला नाही, त्यामुळे तांबे पिता-पुत्रांच्या बंडामागे भाजपचा हात तर नाही ना? याबाबत राजकीय चर्चा जोरात सुरू आहेत. काँग्रेसनेही सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.

रत्नागिरीत सोन्या, हिऱ्यापेक्षा मौल्यवान असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी

मुंबईप्रमाणेच दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचे लोण आता कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात देखील पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यातील भरणे नाका या ठिकाणी खेड पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत दुर्मिळ व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या परजिल्ह्यातील तीन जणांच्या मुस्क्या आवळल्या आहेत.या कारवाईमध्ये खेड पोलिसांनी तीन परजिल्ह्यातील व्यक्तींसह एका दुचाकीसह एक किलो वजनाचे साधारण किंमत एक कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. खेड पोलिसांची आजपर्यंतची सर्वात मोठी ही कारवाई आहे.

अफगाणिस्तानच्या माजी महिला खासदार नबीजादा यांची गोळ्या झाडून हत्या

अफगाणिस्तानच्या माजी खासदार मुर्सल नबीजादा आणि त्यांच्या सुरक्ष रक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुर्सल या काबूलमधील आपल्या घरी असताना रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. नबीजादा या अमेरिकेच्या समर्थक सरकारमध्ये खासदार होत्या. तालिबानने ऑगस्ट २०२१ मध्ये गनी सरकारला सत्तेतून हाकलून लावत अफगाणिस्तानची सत्ता काबिज केली होती.

कॉपी करणाऱ्या उमेदवारांना ‘या’ राज्यात १० वर्षांसाठी नोकरभरती बंद

सरकारी नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी उत्तराखंड सरकारकडुन एक नवा नियम बनवण्यात आला आहे. या नियमानुसार परीक्षा देणाऱ्या उमेदवाराने जर कॉपी केली, तर त्या उमेदवाराला पुढील १० वर्षांसाठी बॅन करण्यात येईल. म्हणजेच त्या उमेदवाराला १० वर्ष कोणतीही सरकारी नोकरीची परीक्षा देता येणार नाही.

हा नवा नियम ‘अँटी कॉपींग लॉ’ म्हणून ओळखला जाईल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुस्कर सिंग धामी यांनी या नव्या नियमाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, “भरती परीक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्या किंवा चीटिंग करून अयोग्य मार्ग वापरणाऱ्या उमेदवारांना पुढील १० वर्षांसाठी बॅन केले जाईल. हा निर्णय UKPSC पेपर लिकनंतर घेण्यात आला आहे, या पेपर लिकमुळे सुमारे १.४ लाख उमेदवारांची ‘पटवारी लेखपाल’ परीक्षा रद्द करण्यात आली.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.