टॉस जिंकून श्रीलंकेचा गोलंदाजीचा निर्णय, भारताकडून दोघांचे पदार्पण
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी२० सामना आज सुरू आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात आज भारताकडून शुभमन गिल आणि शिवम मावी हे टी२० मध्ये पदार्पण करत आहेत. अर्शदीप सिंग अद्याप तंदुरुस्त नसल्याने तो या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याचं बीसीसीआय़ने सांगितलं आहे.
प्लेइंग इलेव्हन :
शुभमन गिल शिवम मावी, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, हर्षल पटेल, उमरान मलिक, युजवेंद्र चहल.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 26 टी20 सामने झाले आहेत. यापैकी 17 सामन्यात भारताचा विजय झाला असून श्रीलंकेने 8 सामने जिंकले आहेत.
शुक्रवार 2.25, शनिवारी 3.25, रविवारी 4.50, सोमवारी 3.02 कोटी; रितेशचं न संपणारं ‘वेड’
बॉक्स ऑफिसवर सध्या बॉलिवूड नाही तर मराठी सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळतोय. तो सिनेमा म्हणजे “वेड”. रितेश देशमुखच्या वेड या सिनेमानं महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावल्याचं पाहायला मिळत आहे. सिनेमानं पहिल्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक केला. पण आठवड्यात सिनेमानं केलेल्या कमाईनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिनेमानं बॉलिवूडला देखील टक्कर दिल्याचं पाहायला मिळतंय. सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या आठवड्यात सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकल्याचं पाहायला मिळत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर दरदिवशी बक्कळ कमाई करतोय.
महेश कोठारे यांचं आत्मचरित्र होणार प्रकाशित, सासऱ्यांसाठी उर्मिलाची खास पोस्ट
अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने तिचे सासरे डॅम इट किंग महेश कोठारे यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक महेश कोठारे ह्यांच्यासाठी खास पोस्ट करण्यामागे निमित्त देखील तितकेच खास आहे. ज्या नावानं त्यांना लोक ओळखतात त्या नावाने त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित होत आहे. ‘डॅम इट आणि बरंच काही’ आत्मचरित्रात महेश कोठारे यांच्या आयुष्याचा लेखाजोखा चाहत्यांना पुस्तकरूपाने अनुभवायला मिळणार आहे.अभिनेत्री उर्मिला कोठारेने इन्स्टा पोस्ट करत या पुस्तकाबद्दल माहिती दिली आहे. सोबत तिनं पुस्तकाचा कव्हर फोटो देखील शेअर केला आहे. तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 2023 हे वर्ष आमच्यासाठी अतिशय खास गोष्टीने सुरू होणार आहे. आमची प्रेरणा, आमची ताकद आणि आमचा उर्जेचा एकमात्र स्त्रोत ज्यावर आमच्या संपूर्ण टीम चं इंजिन धावतं..श्री महेश कोठारे यांनी त्यांच्या टीम आणि कुटुंबाच्या खूप समजावणी नंतर अखेर त्यांचा जीवनपट कागदावर उतरवण्यास तयारी दाखवली आहे…आणि आता आम्ही तुमच्यासमोर आमच्या आयुष्यातील सर्वात पवित्र दस्तऐवज घेऊन येत आहोत – श्री महेश कोठारे यांचे आत्मचरित्र “डॅम इट आणि बरच काही” पुस्तक प्रकाशन 11 जानेवारी 2023 रोजी आहे.
जत तालुक्यातील पाणी प्रश्न, जलसंपदा विभागाच्या कार्यभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित
सांगली जिल्ह्यातील जत येथील पाणी प्रश्न वर्षानुवर्षे सुटत नसल्याने कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या सिंचन मंत्रालयाजवळ जत येथील पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आजवर झालेल्या प्रयत्नांची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात समोर आली आहे.
त्याचप्रमाणे हा प्रश्न सुटत का नाही याची जी तपशीलवार माहिती मागविली गेली होती. तीदेखील उपलब्ध नाही असे संबंधित मंत्रालयातून सांगण्यात आले आहे. तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांना ती माहिती संबंधितांना द्यावी असे सांगणारे पत्र शासनाच्या जलसंपदा विभागाने त्यांना पाठवले आहे.
धर्मवीर की स्वराज्यरक्षक वादावर पहिल्यांदाच शरद पवार यांची प्रतिक्रिया
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं विधान केलं होतं. अजित पवार यांच्या विधानानंतर राज्यात भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी टीका केली. तसंच अजित पवार यांच्याविरोधात आंदोलनही करण्यात आलं. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजी महाराजांना धर्मवीर बोललं तरी चुकीचं नाही असं शरद पवार म्हणाले आहेत. ठाण्यात काही नेत्यांची नावं धर्मरक्षक अशी दिसून येतात. धर्मवीर काय किंवा धर्मरक्षक काय ? ज्यांना धर्मवीर म्हणायचं त्यांनी धर्मवीर म्हणावं, ज्याला स्वराज्य रक्षक म्हणायंच त्यांनी स्वराज्य रक्षक म्हणावं. राज्याचं रक्षण करण्याचं त्यांनी महत्त्वाचं काम केलं त्याची नोंद आपण घेतली तर त्याची नोंद घेतल्यास चुकीचं नाही. त्याच्यावरून वाद करण्याची गरज नाही. महापुरुषांवरून अकारण वाद नको असेही शरद पवार म्हणाले.
डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्य सेवा ऑक्सिजनवर, बुधवारी होणार आणखी हाल?
राज्यातील निवासी डॉक्टरांनी (मार्ड) वेगवेगळ्या मागण्यांसाठी सोमवारपासून संप पुकारला आहे. या संपात सोलापूर जिल्ह्यातले 400 डॉक्टर सहभागी झाल्यानं वैद्यकीय सेवांवर परिणाम झाला आहे. या प्रकरणात सरकारनं आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर बुधवारपासून हा संप आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे.निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे विद्यावेतन कायम सुरू करावे, या मागणीसाठी तसेच संसदेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा (एनएमसी) कायदा मंजूर करण्यात आला, त्याला विरोध दर्शविण्यासाठी राज्यातील सोळा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांसह रुग्णालयातील सुमारे चार हजार निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. ‘मार्ड’च्या राज्य संघटनेच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील मार्डच्या पदाधिकाऱ्यांसह डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत.
राहुल गांधींनी बहीण प्रियांकाचे केले लाड
काँग्रेसची भारत जोडो यात्रा 9 दिवसांच्या ब्रेकनंतर दिल्लीतून उत्तर प्रदेशात गेली आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे स्वागत प्रियांका गांधी यांनी केले. पदयात्रा जेव्हा दिल्लीत पोहोचली होती तेव्हा राहुल गांधी यांनी सुरक्षेच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आता भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात भारत जोडो यात्रा पोहोचली आहे.
राहुल गांधींसह भारत जोडो यात्रेचे उत्तर प्रदेशात स्वागत करताना प्रियांका गांधी यांनी भाषण केलं. यावेळी राहुल गांधींचे कौतुक केले. सर्व ताकद त्यांच्याविरोधात असतानाही ज्या पद्धतीने राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत आहेत त्याबद्दल अभिनंदन. भारत जोडो यात्रेत व्यासपीठावर एकत्र बसले असताना राहुल गांधी यांनी बहीण प्रियांका गांधी यांचे लाड केले. यावेळी त्यांनी प्रियांका यांच्या खांद्यावर हात टाकत त्यांच्या गालावर अन् कपाळावर किस केलं.
जैन तीर्थक्षेत्र वाचवण्यासाठी मुनींचा प्राणत्याग; मुंबईशी होते खास नाते
झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरला पर्यटन स्थळ बनविण्यास विरोध करणाऱ्या जैन भिक्षू सुज्ञेयसागर महाराज यांनी मंगळवारी आपल्या प्राणाची आहुती दिली. झारखंड सरकारच्या निर्णयाविरोधात ते गेल्या 10 दिवसांपासून उपोषण करत होते. ते 72 वर्षांचे होते. सुज्ञेयसागर 25 डिसेंबरपासून सांगानेर येथे आमरण उपोषणाला बसले होते. मंगळवारी सकाळी सांगानेर संघजी मंदिरापासून त्यांची डोल यात्रा काढण्यात आली. यावेळी आचार्य सुनील सागर यांच्यासह जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयपूरमधील सांगानेर येथे जैन साधूला समाधी देण्यात आली.
झारखंड सरकारने गिरिडीह जिल्ह्यातील पारसनाथ टेकडीला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. याविरोधात जैन समाजाचे लोक देशभरात निदर्शने करत आहेत. पारसनाथ टेकडी समेद शिखर म्हणून प्रसिद्ध आहे, जगभरातील जैनांमध्ये हे सर्वोच्च तीर्थक्षेत्र आहे.
दोन खासदारांनंतर आता रशियन इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू; ओडिशातील घटनेने खळबळ
ओडिशामध्ये मंगळवारी (3 जानेवारी 2023) एक रशियन नागरिक मृतावस्थेत सापडला. रशियन नागरिक मृतावस्थेत सापडण्याची ओडिशातली गेल्या पंधरवड्यातली ही तिसरी वेळ आहे. याआधी दोन रशियन पर्यटक मृतावस्थेत सापडले होते.
ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यात पारादीप बंदरात नांगरलेल्या जहाजात मिल्याकोव्ह सर्जी नावाची 51 वर्षीय रशियन व्यक्ती मंगळवारी मृतावस्थेत सापडली. एम बी अल्दनाह असं त्या जहाजाचं नाव होतं. ते जहाज बांगलादेशातल्या चितगाव बंदरातून पारादीपमार्गे मुंबईत जात होतं. मृत मिल्याकोव्ह सर्जी हा त्या जहाजाचा मुख्य इंजिनीअर होता.
मंगळवारी पहाटे साडेचार वाजता तो जहाजावरच्या त्याच्या चेंबरमध्ये मृतावस्थेत आढळला. त्याच्या मृत्यूचं कारण पोलिसांना अद्याप कळलेलं नाही. पारादीप पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष पी. एल. हारानंद यांनी रशियन इंजिनीअरचा मृत्यू झाल्याच्या बाबीला दुजोरा दिला. तसंच, त्याबद्दल तपास सुरू असल्याचं सांगितलं.
“नोटबंदीचा निर्णय घेताना केंद्राने विश्वासात घेतलं नाही”, आरबीआयची माहिती
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने सोमवारी नोटबंदीबाबत मोठा निर्णय दिला आहे. केंद्र सरकारने सहा वर्षांपूर्वी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा घेतलेला निर्णय ४:१ च्या बहुमताने कायम ठेवला. पण नोटबंदीच्या निर्णय प्रक्रियेत आरबीआयला विश्वासात घेतलं नसल्याची माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे.“नोटबंदीचा निर्णय घेण्याआधी सहा महिने केंद्र सरकार आरबीआयशी सल्लामसलत करत होतं, असं सांगण्यात आलं. पण आरबीआय मंडळाला निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यात आलं नाही. कदाचित आरबीआयचे एक-दोन अधिकारी निर्णय प्रक्रियेचा भाग असतील. पण नोटबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी अर्धा ते एक तास आधी एक बैठक बोलवण्यात आली. तसेच या बैठकीच्या विषयाची माहितीही आरबीआय अधिकाऱ्यांना देण्यात आली नव्हती, असं एका अधिकाऱ्याने सांगितले. नोटबंदीच्या निर्णय प्रक्रियेत आरबीआय बोर्डाला विश्वासात घेतलं नव्हतं, असे संकेत एका अधिकाऱ्याने दिले.
SD Social Media
9850 60 3590