चीन आणि इतर अनेक देशांमध्ये कोविड-19 च्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यानतंर भारत देखील सतर्क झाला आहे. केंद्र सरकार या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना राबवत आहेत. यातच आता देशासाठी आणखी एक महत्वाची आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. भारत बायोटेकची पहिली सुई-मुक्त इंट्रानेसल लस आता सर्व प्रौढांसाठी बूस्टर डोस म्हणून उपलब्ध होईल असे सूत्रांनी न्यूज18 ला सांगितले आहे. हैदराबादस्थित कोवॅक्सिन निर्माता कंपनीची ही नेजल व्हॅक्सिन पुढील आठवड्यापर्यंत Co-WIN वर उपलब्ध केली जाईल असे सूत्रांनी सांगितले. मात्र या लसीची किंमत अद्याप निश्चित झालेली नाही अशी माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) या लसीच्या चाचण्या पूर्ण करण्यास परवानगी दिली आहे. तसेच येत्या काही दिवसांत या लसीच्या प्रगतीबाबात औपचारिक घोषणा केली जाईल. चीनमध्ये सध्याच्या कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत असलेल्या ओमिक्रॉन सब-व्हेरियंट BF.7 ची तीन प्रकरणे भारतात आढळून आली आहेत. अशा परिस्थितीत ही लस या व्हेरिएंटविरुद्ध लढ्यात अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.
गेल्या महिन्यात सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून (CDSCO) नेजल व्हॅक्सिन BBV154 किंवा Incovacc यांना भारतातील 18+ लोकसंख्येसाठी हेटरोलॉजस बूस्टर डोस म्हणून आणीबाणीच्या परिस्थितीत प्रतिबंधित वापर करण्यास ग्रीन सिग्नल मिळाला होता. हेटरोलॉजस बूस्टिंगमध्ये एखाद्या व्यक्तीला प्राथमिक डोस सीरीजमध्ये वापरण्यात आलेल्या लसीपेक्षा वेगळी लस दिली जाते. दरम्यान, भारत बायोटेकने सांगितले होते की त्यांची कोविड-19 इंट्रानासल लस, इन्कोव्हॅक, कंट्रोल्ड क्लिनिकल ट्रायल फेज III मध्ये सुरक्षित, सहनशील आणि इम्युनोजेनिक असल्याचे सिद्ध झाले आहे.
भारत बायोटेकच्या मते इंट्रानेजल लसीचे अनेक फायदे आहेत. कारण नेजल रूटमध्ये श्लेष्मल त्वचाच्या संघटित रोगप्रतिकारक प्रणालीमुळे लसीकरणाची उत्कृष्ट क्षमता असते. हे नॉन-इन्व्हेंसिव्ह आणि सुई-मुक्त देखील आहे. याशिवाय ही लस प्रशासनासाठी सुलभ देखील आहे कारण ती देण्यासाठी प्रशिक्षित आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत नाही.
चीन, अमेरिका आणि जपानसह इतर देशांनी कोविड-19 प्रकरणांमध्ये मोठी वाढ नोंदवल्यानंतर भारत सतर्क झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी सांगितले की केंद्र सरकार साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी वचनबद्ध आहे. तसेच त्यांनी राज्यांना सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी कोविड-योग्य वर्तन लागू करण्याचे आवाहन केले. सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना त्यांनी केंद्र सरकार जागतिक कोविड-19 परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि त्यानुसार पावले उचलत आहे अशी माहिती दिली. तसेच राज्यांना नवीन प्रकारांचा वेळेवर मागोवा घेण्यासाठी जीनोम अनुक्रम वाढवण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.