कोल्हापुरात विविध क्रीडा प्रकारात आपला नावलौकिक मिळवलेले खेळाडू बघायला मिळतात. यातील कित्येकांची घरची परिस्थिती बेताचीच असते. असाच एक कोल्हापुरचा चॅम्पियन बनलेला जिनेन्द्र बाईक रेसिंग मध्ये आपले करियर घडवत आहे. नुकत्याच झालेल्या एमआरएफ नॅशनल मोग्रिप सुपरक्रॉस चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने अजिंक्यपद मिळवत एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जिनेन्द्र सांगावे हा फक्त 13 वर्षांचा बाईक रेसर आहे. अब्दुललाट इथे राहणाऱ्या शेतकरी कुटुंबात जिनेन्द्र सांगावेचा जन्म झाला. जिनेन्द्रने जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले आहे. तर सध्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आठवीत शिकत आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून तो लहान बाईक चालवू लागला. तर सातव्या वर्षापासून तो स्पर्धेत भाग घेऊ लागला. हळूहळू त्याला बाईक चालवण्याचा छंदच जडला आणि आता तो थरारक खेळ असलेल्या बाईक स्पोर्ट्समध्ये तरबेज झाला. जिनेन्द्र सुरवातीला मोहिते रेसिंग अकॅडमीमध्ये सराव करत होता. तर सध्या इंदिरा मिल परिसरात तो त्याचा सराव करत आहे.
काय काय स्टंट करतो जिनेन्द्र?
दुचाकीवर धाडसी स्टंट्स जिनेन्द्र आता सहज करू शकतो. नुकत्याच झालेल्या एमआरएफ नॅशनल मोग्रिप सुपरक्रॉस चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने अजिंक्यपद मिळवले आहे. जिनेन्द्र याला 80 ते 90 फुटांपर्यंत दुचाकी सहज उडवता येते. तर 209 किमी प्रतितास वेगाने दुचाकी चालवणे, दुचाकी चालवताना चित्त थरारक कसरती करणे, असे खेळ त्याने आत्मसात केले आहेत.