तर खोके कुणाकडे गेले ते एक दिवस सांगेल; दीपक केसरकरांचं थेट ठाकरेंना आव्हान

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर गद्दार, खोके अशी टीका केली. यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केसरकर यांनी पहिल्यांदाच थेट ठाकरेंना आव्हान दिलं आहे. “ज्यांनी जीवन वेचलं, ज्यांनी शिवसेनेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं त्यांची बदनामी केली जात आहे. बदनामी सहन करण्याची देखील एक मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडली तर आम्ही देखील बोलू. शिवाय सततच्या बदनामीमुळे आमचा देखील संयम सुटला तर खोके कुणाकडे गेले ते एक दिवस सांगितलं जाईल. फ्रीजचे बॉक्स भरून कुणाकडे काय गेलं हे देखील सांगू, असा इशाराच केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. ते गुवाहाटी येथून बोलत होते.

बुलढाणा येथील चिखली येथे उद्धव ठाकरे यांची आज सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी केलेल्या आमदार आणि खासंदारांवर पुन्हा एकदा टीका केली. त्यानंतर दीपक केसरकर यांनी प्रत्यूत्तर देत उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

..तर आम्हालाही मर्यादा सोडून बोलावं लागेल : केसरकर

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळे जास्त बोलत नाही. म्हणून त्यांनी काहीही बोलू नये. आमच्याकडे पण खूप गोष्टी आहेत. खोटं बोलण्याची मर्यादा ओलांडली तर आम्ही देखील तोंड उघडू. ठाकरे घराण्याविषयी आम्हाला आदर आहे. त्यांची बदनामी व्हावी अशी आमची इच्छा नाही. पण, आमची अशीच बदनामी केली तर आम्ही देखील खोके कोठे गेले हे सांगू. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक का लढवली नाही? शेतकऱ्यांच्या हितासाठी उद्धव ठाकरे यांनी काय केलं? ते त्यांनी सांगावं, असं आव्हान देखील दीपक केसरकर यांनी यावेळी केलं.

“आम्ही 25 जण उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडून आपण आपल्या मूळ मित्र पक्षाकडे जावू, असं म्हणालो होतो. मात्र, त्यावेळी त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचललं. त्यांनी खोटं बोलण्याची मोहीम राबवली आहे. खोटं बोलण्यासाठी अनेक लोकांची नेमणूक केली. खोके-खोके म्हणून कोणाला हिनवता. एक दिवस या आमदारांचा संयम सुटेल आणि कायद्यामध्ये जसा माफीचा साक्षीदार हे कलम आहे. मग कळेल खोके कोणाकडे गेले ते. खोटं बोलण्याची देखील एक मर्यादा असते. त्यांनी ती मर्यादा ओलांडू नये अन्यथा आम्ही देखील तोंड उघडू, असा इशारा दीपक केसरकर यांनी यावेळी दिला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

मुंबईनंतर माझी ही पहिलीच जाहीर सभा आहे. ज्या ठिकाणी जिजाऊंचा जन्म झाला. आज संविधान दिन आहे. मात्र, संविधान म्हंटल्यावर काय बोलायचे हा प्रश्न आहे. कारण, संविधान आज सुरक्षित आहे का? हा प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी मी आणि प्रकाश आंबेडकर एका मंचावर आलो होतो. त्यावेळी मनात प्रश्न आला लोकशाही कशी वाचवायची? काही जण 40 रेडे घेऊन तिकडे गेलेत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली.मी मुख्यमंत्री झालो तेव्हा शिवतीर्थावर शपथ घेतली आणि एकविरा देवीकडे गेलो होतो. स्वतःचे आयुष्य माहीत नाही ते भवितव्य काय ठरवणार? आज नवस फेडायला आणि गेल्या आठवड्यात हात दाखवायला गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.