हृदयविकार हे महाराष्ट्रात होणाऱ्या मृत्यूंचे एक प्रमुख कारण असून हृदयविकारामुळे होणाऱ्या अकाली मृत्यूंचे प्रमाण कमी करणे हे आरोग्य व्यवस्थेसमोरील एक प्रमुख आव्हान आहे. या आव्हानाचा सामना करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाच्या माध्यमातून सध्या राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये ‘स्टेमी महाराष्ट्र’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. लवकरच संपूर्ण राज्यात या प्रकल्पाचा विस्तार केला जाणार असल्याचे आरोग्य विभागातील ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. हृदयरुग्णांसाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प असून यासाठी आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
‘स्टेमी’ (म्हणजे एसटी एलिव्हेशन इन मायोकार्डियल इन्फाक्शन) हा सामान्यतः आढळणारा हृदयविकाराचा प्रकार आहे. यात हृदयाच्या काही भागास होणारा रक्तपुरवठा थांबल्यामुळे अपुऱ्या ऑक्सिजनअभावी हृदयाच्या मांसपेशींना इजा होते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. स्टेमी प्रकल्पाच्या माध्यमातून अशा रूग्णांना वेळेत उपचार मिळाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने होणारे मृत्यू मोठ्या प्रमाणात टाळता येतील, असा विश्वास आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी व्यक्त केला.
हृदयविकाराच्या रूग्णांना तत्परतेने आवश्यक उपचार उपलब्ध करून देऊन हृदयविकारामुळे होणाऱ्या अकाली मृत्यूंचे प्रमाण कमी करणे. हृदयविकाराची लक्षणे व त्याकरिता उपलब्ध निदान व उपचार सुविधा याबाबत जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे. प्रमुख उद्दिष्टांसह ‘स्टेमी महाराष्ट्र’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. गेल्या काही दशकांमध्ये कोरोनरी आर्टरी रोगांमुळे मृत्यू आणि पक्षाघाताच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. देशातील ग्रामीण भागातील तीन ते चार टक्के आणि शहरी भागात आठ ते दहा टक्के व्यक्तींना हृदयरोग असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात हृदयविकार व त्यासंबंधित आजार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नांदेड, औरंगाबाद, अकोला, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, जालना व कोल्हापूर या १२ जिल्ह्यांमध्ये सुरु असलेल्या या प्रकल्पांतर्गत फेब्रुवारी २०२१ पासून आतापर्यंत दोन लाख ६६ हजार ५३३ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून एकूण दोन लाख ९६ हजार ५२७ ईसीजी काढण्यात आले आहेत. यात एकूण ७१०५ रुग्णांच्या ईसीजीत हृदयविकारासंबंधित बदल आढळून आले असून, त्यापैकी २६३२ रूग्ण हे स्टेमी हृदयविकाराचे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. आगामी काळात राज्यातील सर्व जिल्ह्यात या उपक्रमाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या सहसंचालिका डॉ. पद्मजा जोगेवार यांनी सांगितले. यासाठी संबंधित आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे.
स्टेमी प्रकल्पांकरिता हब आणि स्पोक मॉडेलचा वापर करण्यात आला असून स्पोक स्वरूपात राज्यातील अतिदक्षता विभाग उपलब्ध असणारी ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये व हृदयरोगांकरिता सेवा प्रदान करणाऱ्या कार्डिअॅक केअर युनिट उपलब्ध असणाऱ्या जिल्हा रूग्णालयांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील एकूण १४५ शासकीय रूग्णालये या प्रकल्पात स्पोक स्वरूपात कार्यान्वित आहेत. हृदयविकाराची लक्षणे आढळून आलेल्या रूग्णांना स्पोक स्तरावर निःशुल्क ईसीजी सुविधा प्रदान केली जाते. क्लाऊड तंत्रज्ञान आधारित सेवेद्वारे विश्लेषणाकरिता हा ईसीजी तज्ञांकडे पाठविला जातो.
ईसीजी विश्लेषणाकरिता कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. याकरिता बंगळुरूस्थित ट्रायकॉग हेल्थ या संस्थेशी सांमजस्य करार करण्यात आला असून तेथील तज्ञांमार्फत ईसीजी विश्लेषण अहवाल संबंधित स्पोकला १० मिनिटांच्या आत कळविणे बंधनकारक आहे. आतापर्यंतच्या ईसीजी विश्लेषणाची आकडेवारी पाहता सरासरी ४ मिनीटांत हा अहवाल प्राप्त होत असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.
हृदयविकाराशी सबंधित ईसीजी बदल आढळून स्टेमी निदान झालेल्या रुग्णांना स्पोक स्तरावर उपलब्ध असल्यास, त्वरित रक्तगुठळी विरघळवणाऱ्या औषधांद्वारे उपचार करून तद्नंतर पुढील उपचारांकरिता रूग्णांना हब संस्थेस संदर्भित केले जाते. रूग्णाला हब संस्थेत संदर्भित करण्यासाठी १०८ रुग्णवाहिका सेवेचा वापर केला जातो. ‘महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना’ व कार्डियॅक कॅथलॅब उपलब्ध असणाऱ्या खासगी रूग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये यांना हब स्वरूपात या प्रकल्पांतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत स्टेमी प्रकल्पांतर्गत एकूण ३८ हब कार्यान्वित असून हृदयरोगतज्ञांच्या माध्यमातून हब रूग्णालयात अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास हृदयशस्त्रक्रिया उपचार केले जातात. ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने’अंतर्गत आतापर्यंत शेकडो रुग्णांनी हृदयविकारांसंबंधित उपचारांचा लाभ घेतला आहे.