येथील ज्ञानवापी मशीद संकुलात कथितरीत्या आढळलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेवर जलदगती न्यायालय येत्या ८ नोव्हेंबरला निकाल देणार आहे. जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश महेंद्र पांडे यांनी याचिकेवरील दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकले आणि निर्णय ८ नोव्हेंबपर्यंत राखून ठेवला, अशी माहिती याचिका दाखल करणाऱ्या हिंदू पक्षाची बाजू मांडणारे अॅड. अनुपम द्विवेदी यांनी दिली.
विश्व वेदीक सनातन संघाचे सरचिटणीस किरण सिंह यांनी गेल्या २४ मे रोजी वाराणसी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी ज्ञानवापी मशिदीत मुस्लीम नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची आणि मशीद परिसर सनातन संघाच्या ताब्यात देण्याची आणि शिवलिंगाची पूजा करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश विश्वेश यांनी सनातन संघाची याचिका जलदगती न्यायालयाकडे वर्ग केली होती.