मागील काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात संघर्ष सुरू आहे. अखेर आज शिवतीर्थावर उद्धव ठाकरे गटाचा आणि बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला लोकांची गर्दी जमवण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, राज्यातील लोकांना दसरा मेळाव्यासाठी येता यावं, यासाठी शिंदे गटाने १० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप केला जात आहे. यावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या १८०० बसेस बूक करण्यासाठी शिंदे गटाकडून १० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ने दिलं आहे. दसरा मेळाव्याच्या माहिती देताना दीपक केसरकर म्हणाले, दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवायची नसते, ती आपोआप होत असते. जो जो महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक आहे, त्यांना असं वाटतंय की त्यांच्या मनातला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाला आहे. त्यामुळे असंख्य लोक मेळाव्याला येऊ इच्छित आहेत.
त्यांना दसरा मेळाव्याला यायचं असेल तर त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था केली आहे. प्रत्येकजण स्वत: तिकीट काढत असतो. पण दसरा मेळाव्याला येण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने पैसे भरले किंवा आमच्या शिवसैनिकाने पैसे भरले तर यासाठी कुणाला वाईट वाटण्याचं काहीही कारण नाही, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून ३५० बसेसचं बुकिंग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील मेळाव्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ३५० बसेसचं बुकिंग केल्याची माहिती औरंगाबाद मध्यवर्ती आगारप्रमुख संतोष घाणे यांनी दिली आहे. या गाड्या सिल्लोड, शेगाव येथे पाठवण्यात आल्या आहेत. गाड्या चालवताना वाहन चालकांनी गणवेश परिधान करावा. वाहन चालवताना शिस्त पाळावी, असे आदेश देण्यात आल्याची माहिती आगरप्रमुख संतोष घाणे यांनी दिली आहे.