तैवानला रविवारी भूकंपाचे तीव्र धक्के बसले. त्यामुळे या देशाचा बहुतांश भूभाग हादरला. यामुळे एक तीन मजली इमारत कोसळली. त्यात चार जण अडकले होते. येथील एका डोंगरावर सुमारे चारशे पर्यटक अडकले. एका प्रवासी रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरले. भूकंपामुळे जपानच्या हवामान संस्थेने तैवानजवळील जपानच्या दक्षिण भागातील बेटांसाठी सुनामीचा इशारा दिला होता. नंतर तो मागे घेण्यात आला.
शनिवारी संध्याकाळपासून भूकंपाच्या धक्क्यांनी तैवानची आग्नेय किनारपट्टी हादरत होती. या वेळी ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा जोरदार धक्का बसला. अद्याप कुणी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही. तैवानच्या मध्यवर्ती हवामान केंद्रातर्फे सांगण्यात आले, की या भूकंपाचा केद्रिबदू चिशांग शहरात सात किलोमीटरवर (चार मैल) खोलीवर होता. तैवानच्या अधिकृत वृत्तसंस्थेने सांगितले, की युली गावात तळमजल्यावरील ग्राहक सुविधा केंद्र आणि वरील मजल्यांवर निवासस्थाने असलेली तीन मजली इमारत कोसळली. युलीमध्ये सुमारे सात हजारांहून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. येथील जलवाहिन्यांचेही नुकसान झाले आहे.
युलीजवळील ग्रामीण भागात पूल कोसळला. तेथील डोंगरावर सुमारे ४०० पर्यटक अडकल्याचे वृत्त आहे. युली आणि भूकंप केंद्रिबदू असलेल्या चिशांगदरम्यान असलेल्या फुली शहरातील डोंग्ली रेल्वे स्थानकावरील फलाटावरील छताचा ढिगारा तेथून जाणाऱ्या एका रेल्वेगाडीवर पडल्यानंतर सहा डबे रुळावरून घसरले. यातील २० प्रवाशांपैकी कोणीही जखमी झाले नसल्याचे समजते.