दहीहंडीच्या निमित्ताने मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात राजकीय काला रंगला. शिवसेनेकडून शिवसेना भवनबाहेर निष्ठेच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं. तर भाजपने आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये दहीहंडी लावली. वरळीच्या जांभोरी मैदानातल्या या दहीहंडीमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी हजेरी लावली. दहीहंडीच्या व्यासपीठावरून नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना डिवचलं.
‘वरळीमध्ये भाजपलं कोणी आव्हान द्यायचा प्रयत्न करू नये. वरळी हा त्यांचा गड आहे, पण प्रत्येकाचा गड कसा सर करायचा आणि प्रत्येकाला भायखळ्याच्या पेंग्विन पार्कमध्ये कसं पाठवायचं, हे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे,’ असं नितेश राणे म्हणाले.
‘विधानसभेत मी म्याव म्याव आवाज काढला तर काय अवस्था झाली, हे महाराष्ट्राने पाहिली, उगाच डरकाळी फोडण्याचा प्रयत्न कुणी करू नये, मुंबई कुणाच्या साहेबांची नाही. मुंबई तुमच्यासारख्या असंख्य मुंबईकरांची आहे,’ असं नितेश राणे म्हणाले.
वरळी या मतदारसंघातून आदित्य ठाकरे, सुनिल शिंदे आणि सचिन अहिर हे शिवसेनेचे तीन आमदार आहेत, यातले आदित्य ठाकरे विधानसभेचे तर शिंदे आणि अहिर विधानपरिषदेचे आमदार आहेत, तरीही वरळीच्या जांभोरी मैदानात भाजपला दहीहंडीचं आयोजन करण्यात यश आलं.
दरम्यान या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. जांभोरी मैदानासाठी आम्हीच परवानगी मागितली नव्हती, दोन वर्षांपूर्वी अडीच कोटी रुपये खर्चून आम्ही या मैदानाचं सुशोभिकरण केलं, प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून बालीशपणा करू नका, असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं.