जागतिक शिक्षक पुरस्कारप्राप्त रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा नामंजूर

वादग्रस्त ठरलेले जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांनी त्यांच्या विरोधात झालेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकपदाचा दिलेला राजीनामा सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने प्रशासकीय कारणास्तव नामंजूर केला आहे.

माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षक असलेले डिसले यांनी ‘फुलब्राइट शिष्यवृत्ती’साठी शैक्षणिक संशोधनाकरिता अमेरिकेत जाण्यासाठी प्रदीर्घ अध्ययन रजा मागितली होती. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर न करणे, यापूर्वी लंडनस्थित वार्की फाउंडेशनकडून मिळालेल्या जागतिक शिक्षक पुरस्काराच्या संदर्भात कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता न करणे तसेच नोकरीच्या जागी हजर न होता सुमारे ३४ महिन्यांचा पगार स्वीकारणे यावरून डिसले यांची खातेनिहाय चौकशी झाली होती. यात चौकशी समितीने त्यांच्यावर ठपका ठेवला होता.

या पार्श्वभूमीवर कारवाई प्रलंबित असतानाच डिसले यांनी शिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या महिन्यात अचानकपणे नाटय़मय घडामोडी घडल्या. डिसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत मंत्रालयात भेट घेतली होती. मात्र ही भेट घडल्यावरही त्यांचा शिक्षकपदाचा राजीनामा प्रशासकीय कारणास्तव नामंजूर करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्धचा सोलापूर जिल्हा परिषदेत कारवाईचा अहवाल देखील अद्याप प्रलंबित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.