एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीमध्येही शिवसेनेला धक्का दिला आहे. राज्यातलं महाविकासआघाडी सरकार पाडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 12 खासदारही आपल्या गटात घेतले आहेत. या 12 खासदारांसोबत शिंदे यांनी आज दिल्लीमध्ये शक्तीप्रदर्शन केलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या या खासदारांसोबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे यांनी राहुल शेवाळे शिवसेनेचे लोकसभेतले गटनेते तर भावना गवळी मुख्य प्रतोद असतील, अशी घोषणा केली आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये राहुल शेवाळे यांनी आपण एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार धनकड यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. तसंच युपीएच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यावरही शेवाळे यांनी आरोप केले. मार्गारेट अल्वा यांनी महाराष्ट्राच्या काँग्रेस प्रभारी असताना शिवसेनेवर अन्याय केल्याचं शेवाळे म्हणाले.
17 वर्षांपूर्वी काय झालं?
2005 साली नारायण राणेंनी शिवसेनेमध्ये बंड केलं आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासूनच प्रभा राव आणि मार्गारेट अल्वा यांनी नारायण राणेंना जोरदार पाठबळ दिलं, एवढच नाही तर राणेंना शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणण्यातही अल्वा आणि प्रभा राव यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगितलं जातं. काँग्रेसमध्ये येताना प्रभा राव यांनी आपल्याला मुख्यमंत्री बनवू, असं आश्वासन दिल्याचंही राणे अनेकवेळा सांगतात.
2005 साली नारायण राणे शिवसेनेच्या 7 आमदारांसोबत बाहेर पडले, यातल्या 6 आमदारांचा पोटनिवडणुकीत विजय झाला. मालवणच्या जागेवर नारायण राणे पोटनिवडणूक जिंकले. राणेंनी 6 आमदार निवडून आणल्यामुळे काँग्रेस विधानसभेतला सगळ्यात मोठा पक्ष झाला. तेव्हा पासून राव आणि अल्वा यांनी दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांडसमोर नारायण राणेंची इमेज राज्यात जनाधार असणारा नेता अशी केल्याचं बोललं जातं.
विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांना महसूल मंत्री करण्यात आलं. पण काँग्रेसमध्ये आल्यानंतर काही काळानंतर त्यांच्यात आणि विलासराव देशमुख यांच्यात खटके उडायला लागले. त्यातच राणे यांना पाठिंबा देणाऱ्या प्रभा राव यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली, तर मार्गारेट अल्वा यांच्यावर पक्षाची शिस्त भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. राणेंना पाठिंबा देणाऱ्या राव आणि अल्वा यांना बाजूला करण्यात आल्यामुळे विलासराव देशमुख यांचा राज्यातला मार्ग मोकळा झाला होता.