‘‘राज्यसभेचे सभापती म्हणून हे माझे १४ वे आणि अखेरचे सत्र (अधिवेशन) असून पाच वर्षांमध्ये मला खूप शिकायला मिळाले. गेल्या १३ सत्रांमध्ये नियोजित २४८ दिवसांपैकी फक्त १४१ दिवस कामकाज होऊ शकले. म्हणजे ५७ टक्के कालावधी वाया गेला’’, अशी खंत राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली.
विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून अखेरचे संसदीय अधिवेशन आहे. १० ऑगस्ट रोजी नायडू यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशी, सोमवारी, नायडू यांनी राज्यसभेत, ‘स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांतील हे शेवटचे अधिवेशन सदस्यांनी अविस्मणीय करावे’, असे आवाहन केले. मात्र, नायडू ‘मन की बात’ वरिष्ठ सभागृहात बोलून दाखवत असतानाच, काँग्रेससह विरोधकांनी वरिष्ठ सभागृहामध्ये विविध मुद्दय़ांवरून सभापतींसमोरील हौदात येऊन घोषणाबाजी केली. महागाई तसेच, वस्तू व सेवा कराच्या मुद्दय़ांवरून प्रामुख्याने काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घातला. ‘‘काही सदस्य कामकाज होऊ द्यायचे नाही असा जणू पण करून सभागृहात येतात. शिवाय, सदस्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुसाठी मतदान करण्यासाठीही जायचे आहे’’, अशी नाराजी व्यक्त करत नायडूंनी सभागृह दिवसभरासाठी तहकूब केले. लोकसभेतही सदस्यांना मतदानासाठी वेळ मिळावा यासाठी सभागृह २० मिनिटांमध्ये तहकूब करण्यात आले होते.
संसदीय समित्यांच्या कामकाजात सुधारणा
संसदीय समितींच्या कामकाजाकडे नायडू यांनी लक्ष वेधले. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून आंतर-अधिवेशन काळात, राज्यसभेच्या आठ विभागांशी संबंधित स्थायी समित्यांपैकी सात समित्यांनी २९ बैठका घेतल्या. या बैठकांचा सरासरी कालावधी दोन तासांपेक्षा जास्त होता व सदस्यांची सरासरी उपस्थिती ४६ टक्क्यांहून अधिक होती. शिक्षण समितीच्या बैठका सर्वाधिक तास झाल्या असून पाच बैठकांमध्ये प्रत्येकी सरासरी ३ तास २२ मिनिटे चर्चा झाल्याची माहिती नायडू यांनी दिली.
खुल्या मनाने चर्चा झाली पाहिजे -मोदी
संसदेत खुल्या मनाने संवाद व चर्चा झाली पाहिजे. मी सर्व खासदारांना सखोल चिंतन करण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले. संसदेत कामकाज होते आणि प्रत्येक सदस्याच्या प्रयत्नाने संसदेत सर्वोत्तम निर्णय घेतले जातात. त्यासाठी संसद सदस्यांनी या अधिवेशनाचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका या अधिवेशनादरम्यान होत असून या अधिवेशनाच्या काळातच नवे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देशाला मार्गदर्शन करतील, असेही मोदी म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर मोदींनी संसद भवनाच्या पहिल्या मजल्यावरील क्रमांक ६३ च्या खोलीत जाऊन मतदान केले.