बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा जादू पसरवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा होय. प्रियांका चोप्रा जानेवारीमध्ये आई बनली आहे. खरं तर अभिनेत्रीने सरोगेसीद्वारे लेकीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीने आणि पती निक जोनसने ही आनंदाची बातमी चाहत्यासोबत शेअर केली होती. प्रियांका आई झाल्यापासून, चाहते तिच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या प्रियांकाने अद्यापही आपल्या लेकीचा चेहरा दाखवलेला नाहीय. मात्र नुकतंच अभिनेत्रीने आपल्या आईच्या वाढदिवसासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिच्या लेकीची पहिली झलक सर्वांना पाहायला मिळत आहे.
प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपले फोटो व्हिडीओ शेअर करुन आपल्या चाहत्यांना अपडेट्स देत असते. तिच्या प्रत्येक पोस्टची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. आता ही देसी गर्ल एक ग्लोबल अभिनेत्री बनली आहे. दरम्यान प्रियांकाने तिची आई मधु चोप्रा यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिची सहा महिन्यांची लेक मालती तिच्या आजीच्या मांडीवर दिसत आहे. या खास फोटोसोबत अभिनेत्रीने आपल्या आईसाठी एक सुंदर पोस्ट लिहिली आहे.सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अभिनेत्रीचा हा व्हायरल फोटो अतिशय खास आहे. कारण या एकाच फोटोमध्ये आपल्याला तीन पिढ्या एकत्र पाहायला मिळत आहेत. प्रियांका आणि आई मधु चोप्रा यांच्या चेहऱ्यावरील आनंद या फोटोमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत प्रियांकाने लिहिलंय, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. तुझ्या या सकारात्मक हास्याने तू सदैव हसत राहा. तू मला तुझ्या आयुष्याबद्दल असलेल्या या उत्साहाने आणि प्रत्येक दिवसाच्या अनुभवाने खूप प्रेरणा देतेस! तुझी युरोप ट्रीप हे तुझ्या वाढदिवसाचं सर्वात चांगलं सेलिब्रेशन होतं.” लेक मालतीकडूनसुद्धा प्रेम देत अभिनेत्रीने लिहिलंय, ”लव्ह यू टु मून आणि बॅक टू नानी”. प्रियांकाच्या या पोस्टवर निकसोबत अनेकांनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रियांका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास आहे. शिवाय ती अनेक हॉलिवूड वेबसीरीजमध्ये व्यग्र आहे. प्रियांकाचे चाहते तिला पुन्हा बॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. प्रियांका लवकरच फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्टसुद्धा असणार आहेत. हा चित्रपट एक रोड ट्रिपवर आधारित असणार आहे.