मध्यरात्री उशीरा सुरू झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. बऱ्याच राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपाचे तीन सदस्य राज्यसभेवर निवडून गेले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. या विजयामुळे देवेंद्र फडणवीसांची चाणक्यनीती यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
“कोल्हापूरचा पैलवानच भेट दिला”
शुक्रवारी सकाळपासून या मतदानाला सुरुवात झाली होती. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार या दोघांचा विजय होईल असा दावा केला जात होता. मात्र, मध्यरात्री झालेल्या मतमोजणीमध्ये संजय पवार यांना फक्त ३८ मतं मिळाली असून धनंजय महाडिकांना ४१ मतं मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा धक्कादायक पराभव मानला जात आहे. तिथे दुसरीकडे भाजपाकडून देवेंद्र फडणवीसांची रणनीती कामी आल्याचं देखील बोलल जात आहे. “चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवशी त्यांना कोल्हापूरचा एक पैलवानच भेट दिला”, अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिकांच्या विजयावर देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
कोणाचा पराभव झाला ? पहिल्या पसंतीची सर्वाधिक मतं संजय पवार यांना पडली आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मोठा विजय झाला, हे चित्र उभे केले जातंय.काही अपेक्षित मत आम्हाला पडली नाही, ते आम्हाला माहित आहे. त्यांना विजय मिळाला, अभिनंदन, अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले त्यांच्याकडे गेले नाहीत. काही अपक्ष त्यांच्याकडे केले. त्यांची व्यूहरचना उत्तम केली होती. आमिषे,केंद्रिय यंत्रणांचा वापर केला गेला. एक जागा त्यांनी जिंकली. माझं एक मत त्यांनी बाद करायला लावलं. निवडणूक आयोगाने त्यांना प्राधान्य दिले.आम्हीही दोघांविरोधात तक्रार केली होती.पण दखल नाही घेतली, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
कुणाला किती मतं मिळाली?
पियूष गोयल – 48
अनिल बोंडे – 48
संजय राऊत 41
प्रफुल्ल पटेल – 43
इम्रान प्रतापगढी 44
संजय पवार – 33
धनंजय महाडिक – 41
असा झाला गेम
भाजपकडे एकूण 106 आमदार आणि 7 अपक्ष समर्थक मिळून 113 आकडा होता. त्यामुळे 123 मते भाजपला पहिल्या प्राधान्याची मिळाली. यात 48 मते अनिल बोंडे आणि 48 मते गोयल यांना मिळाली. त्यामुळे एकूण 96 मतं झाली. त्यानंतर धनंजय महाडिक यांना 17 मते पहिल्या पसंतीची मिळाली. 27 पैकी 17 मते भाजपची होती. उरली 10 मते बाकी होती. यात 3 मतं बविआने महाडिक यांना दिली. 1 मत मनसेने दिलं. त्यानंतर 9 मतं अपक्षांची असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.