जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा काश्मिर पंडितांना लक्ष्य केलं आहे. बडगाममधील चदूरा इथल्या तहसील कार्यालयात दहशतवाद्यांनी एका सरकारी कर्मचाऱ्याला गोळ्या झाडल्या. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी कार्यालयात घुसले आणि त्यांनी राहुल भट्ट नावाच्या कर्मचाऱ्यावर गोळीबार झाडल्या.
जखमी अवस्थेत राहुल भट्ट यांना श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. काश्मीर टायगर्स (TRF) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे. या हल्ल्यात 2 दहशतवादी सहभागी असून त्यांनी या गुन्ह्यासाठी पिस्तुलाचा वापर केल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. राहुल भट्ट यांच्यावरील प्राणघातक दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. राहुल भट्ट हे चडूरा इथल्या तहसील कार्यालयात कामाला होते.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. बुधवारीच बांदीपोराच्या जंगलात सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. याआधी मंगळवारी अनंतनाग जिल्ह्यातील डुरू भागातील क्रेरी इथं झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं होतं.