राज्यात २०२० मध्ये मृतांच्या संख्येत आधीच्या वर्षांच्या तुलनेत सुमारे १६.५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे नागरी नोंदणीच्या अहवालानुसार निदर्शनास आले आहे. देशभरात ही वाढ सुमारे ६.२ टक्के असून बिहारपाठोपाठ महाराष्ट्रात जास्त वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे २०२० मध्ये बहुतांश राज्यांमध्ये मृतांच्या संख्येत वाढ झाली असताना मात्र उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा, केरळ, दिल्ली आणि मणिपूर या राज्यांमध्ये घट झाली आहे.
नागरी नोंदणी २०२० चा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. यानुसार, २०१९ मध्ये राज्यात ६ लाख ९३ हजार ८०० जणांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये ही संख्या ८ लाख ८ हजार ७८३ वर गेली आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये मृतांची संख्या १ लाख १४ हजार ९८३ ने वाढली आहे. २०२० मध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी ५४ हजार ५४७ आहे.
राज्यात सर्वाधिक मृत्यू हे मुंबईत झाले आहेत. मुंबईमध्ये २०२० मध्ये १ लाख ११ हजार ९४२ मृतांची नोंद आहे. यातील सुमारे ११ हजार ९२७ मृत्यू करोनामुळे झाले आहेत. त्याखालोखाल पुणे, ठाणे आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील सुमारे ६१ टक्के मृत्यू शहरी भागात, तर उर्वरित ३९ टक्के मृत्यू ग्रामीण भागात झाले आहेत. महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या करोना मृत्यूच्या आकडय़ांपेक्षा १० पटीने अधिक मृत्यू झाल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केल्यामुळे मृतांच्या संख्येचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
करोनाबाधित परंतु इतर आजारांनी मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची नोंद करोना मृत्यू म्हणून करण्याबाबतही या आधी अनेक वेळा वाद झाले होते. अखेर या मृतांचा करोना मृतांमध्ये समावेश करण्याचा निर्णय भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने घेतल्यामुळे एप्रिलमध्ये राज्यातील करोनाबाधित मृतांच्या सुमारे साडेतीन हजारांनी वाढ झाली होती.