पुनर्विकासाच्या नावाखाली ‘बालगंधर्व’ पाडण्याचा घाट?

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाच्या नावाखाली बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. बालगंधर्व रंगमंदिराची सध्याची वास्तू पाडून तेथे नाट्यसंकुल उभारण्यात येणार असून तीन विविध आसनक्षमतेची नाट्यगृहे, तीन कलादालने, खुला रंगमंच आणि उपाहारगृह बांधण्याचे नियोजित आहे. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनीही या नव्या प्रस्तावाला सहमती दर्शविल्याने येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मेट्रोच्या प्रस्तावित स्कायवॉक आणि पार्किंगसाठीच शहराचे सांस्कृतिक वैभव आणि सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदापर्ण केलेली रंगमंदिराची वास्तू पाडून तिच्या पुनर्विकासाचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्षाची महापालिकेत एकहाती सत्ता आल्यानंतर तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका अंदाजपत्रकात बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाची संकल्पना मांडली.

मात्र महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेले बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास विरोध दर्शविण्यात आला. त्यामुळे पुनर्विकासासाठी महापालिकेच्या स्तरावर समिती स्थापन करण्यात आली. समितीने बालगंधर्व रंगमंदिराचा आराखडा करण्यासाठी वास्तुविशारदांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यातील काही प्रस्ताव स्वीकारून भारतीय जनता पक्षाने बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा घाट कायम ठेवला. समितीने पुनर्विकासासंदर्भातील अंतिम प्रस्तावांचे सादरीकरण उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्यापुढे केले.

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील वनाज ते रामवाडी या मार्गिकेचे काम सध्या सुरू आहे. या मार्गिकेचे एक स्थानक नदीपात्रात असून जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यान येथे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने स्कायवॉक प्रस्तावित केला आहे. या स्कायवॉकचे नियोजन करताना पादचारी आणि मेट्रोच्या प्रवाशांसाठी पार्किंग उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी संभाजी उद्यानातील जागेबरोबरच बालगंधर्व रंगमंदिरातील पार्किंगची जागा उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळेच बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा घाट घालण्यात आला असल्याचा आरोप होत आहे.

सध्याचे बालगंधर्व रंगमंदिर साडेबावीस हजार चौरस फूट जागेवर असून मूळ वास्तू पाडून साडेतीन लाख चौरस फुटांचे रंगमंदिर बांधण्यात येणार आहे. नव्या वास्तूमध्ये ८०० ते ९०० दुचाकी आणि ३५० चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था असेल. कलावंत आणि रसिकांची मागणी लक्षात घेऊन एक ऐवजी तीन नाट्यगृहे नियोजित आहेत. एक हजार, पाचशे आणि तीनशे अशी त्यांची आसनक्षमता असेल. सध्याच्या पाचशे चौरस फुटांचे कलादालन पाडून तेथे दहा हजार चौरस फुटाचे एक आणि प्रत्येकी पाच हजार चौरस फुटांची दोन अशी एकूण तीन नवी कलादालने उभारण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय खुला रंगमंच आणि उपाहारगृहाचेही नियोजन आहे.

“बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवासाच्या स्मृती कायमस्वरूपी जतन केल्या जातील. करोना संकटामुळे पुनर्विकासाचा मुद्दा लांबणीवर पडला होता. पुणेकरांना अभिमान वाटेल, अशा पद्धतीने नवीन बालगंधर्व रंगमंदिर उभारण्यात येईल. ” असं माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.