इतर राज्यातील लोक येऊन महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू शकतात
मनसेने मशिदींवरील भोंगे हटवले नाही तर उद्या राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. यासंबंधी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. तसंच त्यांनी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कट आखण्यात आला असल्याचा अलर्ट गुप्तचर विभागाने दिला आहे. इतर राज्यामधील काही लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचं गृह विभागाने सांगितलं आहे.
तर पोलीस राज ठाकरे यांच्यावरही
कारवाई करतील : नाना पटोले
महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे शासन व प्रशासन योग्य ती कारवाई करेल. राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न मविआ सरकार खपवून घेणार नाही. राज ठाकरे यांनी जर कायद्याचे उल्लंघन केले असेल तर पोलीस त्यांच्यावरही कारवाई करतील.” असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
राज ठाकरे यांच्याविरोधात
औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर १ मे रोजी झालेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सभेसाठी अटी व शर्थींसह परवानगी देण्यात आली होती. मात्र सभेदरम्यान या अटींचे पालन झाले नाही आणि नियम देखील मोडले गेल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात सिटीचौक पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक गजानन इंगळे यांनी फिर्याद नोंदवली आहे.
मनसे नेते महेश भानुशाली
यांना घाटकोपरमधून अटक
मनसेने मशिदींवरील भोंग्यांविरोधात उद्या राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला असताना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. मुंबईत मनसे नेते महेश भानुशाली यांना घाटकोपरमधून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातून भोंगे जप्त केले आहेत. हनुमान चालिसा पठण करण्यासाठीचं साहित्यदेखील जप्त करण्यात आलं आहे.
मुंबई भाजपा कार्यालयाबाहेर
शर्मिला ठाकरे यांची गाडी पाहून आश्चर्य
राज्याचं राजकारण तापले असताना सध्या राजकीय वर्तुळात भाजपा आणि मनसेच्या युतीचीही जोरदार चर्चा दिसून येत आहे. राजकीय वर्तुळात जरी राज ठाकरे आणि भाजपा यांची वैचारिक जवळीक वाढत असल्याची आणि युतीची चर्चा असली तरी समाजमाध्यमांवर मात्र राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची गाडी चर्चेचा विषय ठरली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. तर झालं असं की, शर्मिला ठाकरे यांची गाडी सोमवारी मुंबईमधील नरीमन पॉइण्ट येथील भाजपाच्या कार्यालयाबाहेर दिसून आली. आता भाजपाच्या कार्यालयाबाहेर शर्मिला ठाकरेंची गाडी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
राहुल गांधींचा नाईट क्लबमधील
व्हिडीओ व्हायरल
काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा भाजपाच्या निशाण्यावर आहेत. राहुल गांधी यांचा काठमांडू येथील नाईट क्लबमधील व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने पुन्हा एकदा राहुल गांधींना घेरलं आहे. राहुल गांधींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांचा व्हिडीओ ट्वीट केला असून म्हटलं आहे की, “मुंबईला वेठीस धरलं जात असताना राहुल गांधी नाईट क्लबमध्ये होते. जेव्हा त्यांच्या पक्षात अनेक स्फोट होत आहेत तेव्हा ते नाईट क्लबमध्ये आहेत. ते सुसंगत आहेत. काँग्रेस पक्षाने बाहेरील व्यक्तीला अध्यक्षपद सोपवण्यास नकार दिला असतानाच त्यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला फटका बसत आहे”.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर
पुतीन यांना कर्करोगाचे निदान
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या घटनेला दोन महिने उलटून गेले आहेत. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला होता. मात्र दोन महिने उलटून गेले असले तरी रशियाला यश मिळताना दिसत नाही. दुसरीकडे जगभरातून रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. असं असताना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या प्रकृतीबाबत एक बातमी समोर आली आहे. पुतिन यांना कर्करोगाचे निदान झाले असून शस्त्रक्रिया केली जाणार आहे. देशाची सूत्र माजी गुप्तहेर प्रमुख निकोलाई पात्रुशेव यांच्याकडे सोपवणार आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागेल असं सांगितल्याचा दावा अमेरिकेच्या न्यूयॉर्क पोस्टने केला आहे.
जगभरातील मुस्लिम हिंसाचाराचे
बळी ठरत आहेत : जो बायडेन
ईदनिमित्त अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले की, जगभरातील मुस्लिम हिंसाचाराचे बळी ठरत आहेत. या कार्यक्रमाला फर्स्ट लेडी जिल बिडेन, मस्जिदचे इमाम मोहम्मद डॉ. तालिब एम. शरीफ आणि पाकिस्तानी गायक आणि संगीतकार अरुज आफताब यांचीही उपस्थिती होती. ते म्हणाले, “आज हा पवित्र दिवस साजरा करण्यास असमर्थ असलेल्या लोकांचीही आठवण येते. यामध्ये उइघुर आणि रोहिंग्या आणि दुष्काळ, हिंसाचार, संघर्ष आणि रोगराईचा सामना करणाऱ्या सर्वांचा समावेश आहे.”
बनावट हिरे आणि रत्नं गहाण ठेवून मेहुल चोक्सीने घेतलं 25 कोटींचे कर्ज
केंद्रीय तपास संस्थेनं 13,500 कोटी रुपयांच्या PNB घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मेहुल चोक्सीने बनावट हिरे आणि दागिने गहाण ठेवून IFCI कडून 25 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं.
सीबीआयने या प्रकरणी मेहुल चोक्सी, त्याची कंपनी गीतांजली जेम्स आणि सूरजमल लल्लू भाई अँड कंपनी, नरेंद्र झवेरी, प्रदीप सी शाह आणि श्रेणिक शाह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बीडमध्ये राष्ट्रीय महामार्गावरून रंगला राजकीय कलगीतुरा, प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा
बीडमध्ये राष्ट्रीय महामार्गावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रस्ते विकासावरून टीका केल्यानंतर भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘राष्ट्रीय महामार्गाच श्रेय घ्यायला नेत्यांची स्पर्धा लागली आहे. दोष खासदाराला हा दुजा भाव कशासाठी देताय. आमदार, पालकमंत्री तुमच्याकडे आहे. थोडे तुम्हीही काही द्या, असा टोला प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडेंना लगावला.
बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी आज लातूर-बर्दापूर-अंबाजोगाई या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली आहे. तसंच चौपदरीकरणाचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना महामार्ग प्रशासनाला दिल्या. या राष्ट्रीय महामार्गावरील 52 पेक्षा अधिक जणांचा अपघातात जीव गेला. यामुळे हा रस्ता चौपदरी करण्यासाठी खासदारांनी प्रयत्न केले नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना खरपूस समाचार घेतला.
SD social media
9850 60 35 90