करोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत

करोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत देण्यात येत आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात मिळून आतापर्यंत १८ हजार मृतांच्या कुटुंबांना ९० कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. बँकेचा तपशील चुकीचा असणे किंवा अपुरी कागदपत्रे यामुळे ९७२३ अर्ज नामंजूर करण्यात आले असून, त्यामध्ये राज्याबाहेरील काही मृतांच्या नातेवाईकांचा समावेश आहे.

करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येत आहेत. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे म्हणाले, ‘जिल्ह्यातील मृतांची संख्या १९ हजार ६८२ आहे. त्यामध्ये पुणे शहरातील ९३४८, पिंपरी चिंचवडमधील ३८९९ आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ६४३५ आहेत. मात्र, काही रुग्णांना रुग्णालयांतून सोडण्यात आल्यावर त्यांचा घरी मृत्यू झाला आहे. त्यामुळे शासनाच्या नियमावलीनुसार मृत्यू झाल्यानंतर एक महिना आधी संबंधित व्यक्तीला करोना संसर्ग झालेला असल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपये मदत लागू होत आहे.

त्यानुसार शहरासह जिल्ह्यात अर्ज केलेल्यांची संख्या २३ हजार ५८० झाली आहे. त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, ९७२३ अर्ज नामंजूर झाले आहेत. अर्ज मंजूर झालेल्यांपैकी १८ हजार मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपये याप्रमाणे ९० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

या ५० हजारांच्या मदतीसाठी संबंधितांकडून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. बँकेचा तपशील चुकीचा असणे, कागदपत्रे नसणे या कारणांमुळे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. काही मृत हे राज्याबाहेरील आहेत. त्यांच्याही कुटुंबीयांनी अर्ज केले आहेत. मात्र, त्यांना संबंधित राज्याकडून मदत दिली जाणार असल्याने संबंधित अर्ज हे नामंजूर झाले आहेत, असेही बनोटे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.