‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमा आणि त्याच्याभोवती घोंघावणारं चर्चांच वादळ शमण्याचं नाव घेत नाहीये. सर्वच स्तरातून या सिनेमावर भाष्य केलं जातंय. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी असो, किंवा अन्य कुणी… सगळेच जण याविषयी बोलताना दिसतात.
या चित्रपटावरुन सध्या देशाचं राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालंय. अश्यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या सिनेमावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या सिनेमावर बोलतानाच त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल विचारलाय. “मोदीजी, तुम्ही काश्मीर फाईल्स बघण्याचं आवाहन करू लागला तर देशात एक वाक्यता टिकणार कशी?”, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. “काही लोकांनी एक मोहीम सुरू केली आहे. काश्मीरमधून काश्मिरी पंडितांचा एक घटक निघून गेला. त्यावर एक सिनेमा आलाय.
या सिनेमातून मन जोडण्याऐवजी मन विचलित कशी होतील हे पाहिलं गेलं. शिवाय समाजा-समाजात अंतर कसं वाढेल, द्वेष कसा वाढेल या प्रकारची मांडणी करण्यात आली. जेव्हा समाजात विद्वेष वाढवण्याची भूमिका कोणी मांडत असेल आणि ती भूमिका चित्रपटात सांगितली गेली असेल.तो चित्रपट अतिशय चांगला आहे , बघितला पाहिजे,असं जर देशाचे पंतप्रधान म्हणत असतील तर सामाजिक एकवाक्यता टिकवायची कशी, ठेवायची कशी? हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. “संपूर्ण भारतीय जनता पार्टी देशभरात एका चित्रपटाचे पोस्टर लावत आहे. असे चित्रपटाचे पोस्टर लावण्यासाठी तुम्ही राजकारणात आले होते काय? तुमच्या मुलांना काय उत्तर द्याल घरी जाऊन? मुलं विचारतील बाबा काय काम करता? त्यांना सांगाल का चित्रपटाचे पोस्टर लावतो म्हणून.
8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावे लागले, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षे त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही. 8 वर्षे खराब केले. विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी त्यांना लोळण घ्यावं लागत आहे की, वाचव वाचव म्हणून…” अशा शब्दात अरविंद केरजीवाल यांनी ‘द काश्मिर फाईल्स’च्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.