खासदार सांस्कृतिक महोत्सव ईश्वर देशमुख कॉलेज ग्राउंडमध्ये होणार आहे. या महोत्सवात श्रीवल्ली फेम जावेद अली, सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चव्हाण यांच्यासह शंकर महादेवन, अभिनेत्री हेमामालिनी आणि इतर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलाकार हजेरी लावणार आहेत, अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी दिली.
साहित्य, संस्कृती, संगीत, नाट्य, नृत्य अशा अनेक कलांचा संगम असलेला खासदार सांस्कृतिक महोत्सव केंद्रीय मंत्री, खासदार नितीन गडकरी यांच्या कल्पनेतून साकारला गेला आहे. देशात खासदार सांस्कृतिक महोत्सवाची चर्चा होऊ लागली आहे. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार या महोत्सवात आपली कला सादर करण्यासाठी उत्सुक आहेत.
महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी 19 मार्चला माय कंट्री माय म्युझिक या संगीतकार शंकर महादेवन यांच्या लाईव्ह इन कॉन्सर्टने होणार आहे. 20 मार्चला इंडिपॉप व्वीन सुनिधी चौहान, 21 मार्चला वंडर व्हाईस साईराम अय्यर, 22 मार्चला व्हर्सटाईल जावेद अली यांचे लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. 23 मार्चला हास्यकवी संमेलनात पद्मश्री कवी सुरेंद्र शर्मा, सुरेंद्र दुबे, रुण जेमिनी, डॉ. प्रवीण शुक्ला, कविता तिवारी आणि डॉक्टर विष्णू सक्सेना सहभागी होतील. गुरुवारी 24 मार्चला पद्मश्री हेमामालिनी यांच्या राधा रासबिहारी या नृत्यनाटिकेने महोत्सवाचा समारोप होईल. महोत्सवासाठी डिजीटल पासची व्यवस्था करण्यात आली आहे.
विदर्भाची व मध्य भारताची शान असलेल्या या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले आहे.