मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आता नवे गृहमंत्री कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सर्वप्रथम गृहमंत्रीपदासाठी दिलीप वळसे पाटील यांचे नाव पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे.
“सीबीआय चौकशी करत असताना गृहमंत्री पदावर राहणं योग्य नाही असं देशमुख म्हणाले. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. शेवटी आम्हाला न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान ठेवणे गरजेचं आहे. राजीनामा दिला, विषय संपला,” असंही नवाब मलिक यांनी सांगितलं. दरम्यान अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याने गृहमंत्रीपदी कोणाचा वर्णी लागणार याची चर्चा सुरु झाली आहे. नवाब मलिक यांना गृहखात्याचा पदभार कोणाकडे असेल असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “एखाद्या मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर साहजिकच मुख्यमंत्र्यांकडे त्या खात्याची जबाबदारी असते. नंतर मुख्यमंत्री ही जबाबदारी दुसऱ्याकडे देतील. तीन पक्षांचं सरकार असताना चर्चा करुन जो निर्णय होईल तो स्वत: मुख्यमंत्री लोकांना सांगतील”.
मंत्रिमंडळातील खातेवाटपात गृहखात राष्ट्रीवादीला देण्यात आलेलं आहे. त्यामुळे देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीतून कुणाची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू असतानाच काही नावं समोर येत आहेत. यात राज्याचे उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
दिलीप वळसे-पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजते. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्याची इच्छा होती. मात्र, दिलीप वळसे-पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याकडे हे पद देण्यात आलं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा वळसे-पाटील यांच्याकडेच गृहमंत्रीपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे