शिक्षक पात्रता परीक्षा प्रकरणातील तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत 11 मार्चपर्यंत वाढ

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत 11 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. डॉ. प्रीतिश दिलीपराव देशमुख, सुरंजित गुलाब आणि स्वप्नील तिरसिंग पाटील ऊर्फ राजपूत यांची तिघांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. अटकेत असलेला एजंट संतोष हरकळ याने तब्बल 80 अपात्र विद्यार्थ्यांना हॉलतिटीक दिल्याचे उघड झाले आहे. ऑनलाइन पेपर कसा फोडावा, याच्या वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण बिहारमधील पटनामध्ये दिले जात असल्याचे सायबर पोलिसांनी यापूर्वी उघडकीस आणले होते. त्यानंतर सायबर पोलिसांनी टीईटी गैरव्यवहाराचा कट हा दिल्ली शिजल्याची माहिती समोर आणली. दिल्लीमध्ये 2017 मध्ये संशयित आरोपी सौरभ त्रिपाठी, अभिषेक सावरीकर आणि प्रीतेश देशमुख यांची बैठक झाली होती. याच ठिकाणी टीईटी परीक्षेत अपात्र परीक्षार्थीना पात्र करण्याचा कट रचल्याचे समोर आले. त्यामुळे टीईटी गैरव्यवहारांचे धागेदोरे दिल्लीपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. आता यातील तीन आरोपींची कोठडी 11 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेला एजंट संतोष हरकळ याने ऑक्टोबर 2018 मध्ये टीईटी 2018 मधील परीक्षेतील परीक्षार्थीचे गुण वाढविण्यासाठी 650 परीक्षार्थीची यादी तयार केली होती. ती यादी पेनड्राइव्हमध्ये घेत शिवाजीनगरमधील आलिशान हॉटेलमध्ये प्रीतेश देशमुख याला दिली. टीईटी गैरव्यवहार प्रकरणी परीक्षेचे आयोजन करणाऱ्या जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा संचालक डॉ. प्रीतेश देशमुख याच्या सांगण्यावरून दलाल अंकुश हरकळ याने सुरंजित पाटील, स्वप्नील पाटील यांच्यासह इतरांकडून जमा केलेली पाच कोटी 37 लाख रुपयांची रक्कम बेंगळुरुमधील कंपनीचा संचालक अश्विनकुमार याला दिली असल्याचे तपासातून समोर आले आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात डॉ. देशमुखच्या बँक खात्यात परीक्षार्थींनी 10 लाख रुपये पाठवल्याच तपासातून समोर आले आहे. सावरीकरच्या बँक खात्यावर प्रीतिश याने 49 हजार, तर त्याच्या वडिलांनी मार्च 2018मध्ये 1 लाख पाठवले होते. तर आश्‍विनकुमार याच्या बँक खात्यावर प्रीतिश याच्या वडिलांनी सप्टेंबर 2019मध्ये 1 लाख पाठवले. अभिषेक सावरीकर याने डिसेंबर 2019मध्ये ‘टीईटी 2018’च्या परीक्षार्थींच्या माहितीचा डेटा प्रीतिश याला ई-मेल केला होता. स्वप्नील याने एजंटामार्फत परीक्षेतील 150 अपात्र परीक्षार्थींची माहिती जमा करून ती माहिती संतोष हरकळ याच्याकडे नोव्हेंबर 2018मध्ये पाठवली. हे परीक्षार्थी नक्की कोणते आहेत? याचा सखोल तपास करण्यासाठी तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी ॲड. जाधव यांनी केली. न्यायालयाने तिघांच्या कोठडीत 11 मार्चपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.