महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये काल नंदी आणि गणपती दूध पीत असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. ही बातमी भाविकांना समजताचं त्यांनी त्या ठिकाणी जाऊन खरंच दूध पीत आहे का याची पाहणी केली. तर अनेक भक्तांनी दूध आणि पाणी पाजले असल्याचे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. नंदी दूध पीत असल्याचे दावे अनेक जिल्ह्यात करण्यात आले. महाराष्ट्रातल्या नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, पालघर आणि बोईसर इत्यादी ठिकाणी भक्तांनी मंदीरात रांग लावली असल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचवलेले हे व्हिडीओ एक अफवा असल्याचा दावा अंनिसकडून करण्यात आलाय.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील निपाणी निमगावमध्ये इतर जिल्ह्यात नंदी दूध पीत असल्याने तिथल्या ग्रामस्थांनी बापुराव गायकवाड यांच्या शेतात एक बेलेश्र्वर मंदीर आहे. तिथं जाऊन तिथल्या नंदीला पाणी पाजले ते पीत असल्याने तिथं देखील गर्दी झाली असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मनिषा दत्ता गायकवाड यांनी सांगितले की, इतरत्र नंदी पाणी पित असल्याने आमच्या घराशेजारी असलेल्या नंदीला लोकांनी रात्री बारा वाजल्यापासून पाणी पाजायला सुरूवात केली आहे. त्यामुळे तिथं भाविकांची मोठी गर्दी व्हायला सुरूवात झाली आहे. तसेच तिथं अनेकजण व्हिडीओ सुध्दा काढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यातील गावातील महादेवाच्या मंदिरातील नंदी बैल दूध आणि पाणी पीत असल्याचा दावा ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे. नंदीबैल दुध आणि पाणी पीत असल्याचे तसे अनेक व्हिडीओ ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही आपली भूमिका मांडली आहे. अनेकांना 27 वर्षापुर्वी गणपती दूध पीत असल्याच्या अफवेची आठवण झाली आहे. हा दैवी चमत्कार नसून, यामागे वैज्ञानिक कारण असल्याचा दावा अंनिसकडून करण्यात आला आहे.
वारंवार अशा अफवांचे प्रकार घडत आहे. जाणीवपूर्वक हे षडयंत्र आहे. सीबीआयने या प्रकाराची चौकशी करावी असा अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान हा चमत्कार सिद्ध करून लेखी आव्हान प्रक्रिया पूर्ण करून 25 लाख रुपये मिळवा हे आव्हान अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती गेल्या अनेक वर्षापासून देत आहे. ज्यांना वाटतं नंदीची मूर्ती पाणी दुध पीत आहे त्यांनी हे आव्हान स्वीकारावं व्हिडिओ व्हायरल करून समाजाची दिशाभूल करू नये जादू विरोधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो असेही हरीश केदार यांनी म्हटले आहे.