प्रख्यात साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांचे येथील लद्धड हॉस्पिटलमध्ये निधन झाले. साहित्य क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते होते. विविध वृत्तपत्रांच्या स्तंभलेखक साहित्यिक, कवी, निवेदक (nivedak) व प्रख्यात सूत्रसंचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. बुलडाणा येथील भारत विद्यालयाचे ग्रंथपाल साहित्यिकांना घडविणारे अशी त्यांची ख्याती होती. गेल्या चार महिन्यांपासून ते फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत होते.
साहित्य क्षेत्रातील, पत्रकारिता क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटीही घेतल्या होत्या. परंतु आज त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळावर व विदर्भ साहित्य संघ गावावर शोककळा पसरली आहे. श्री लांजेवार हे विदर्भ साहित्य संघाचे गेल्या अनेक वर्षांपासून पदाधिकारी होते. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा परिचय होता. बुलडाणा जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रात एक ऊर्जा स्त्रोत म्हणून ते काम करीत होते. त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे अनेक साहित्यिकांनी त्यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
साहित्य, सामाजिक चळवळींच्या क्षेत्रात सातत्याने सक्रिय राहणारे मित्रवर्य नरेंद्र लांजेवार आपल्याला सोडून गेले. अलीकडे बुलढाणा येथील त्यांच्या निवासस्थानी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठीची भेट अखेरची ठरली. आपल्या कार्याने साऱ्या महाराष्ट्रात गोतावळा निर्माण करणारे हे व्यक्तिमत्व. प्रकृती ठिक नसतानाही लेखन, संपादनाचे काम त्यांनी अव्याहतपणे सुरूच ठेवले होते. एक अतिशय चांगली व्यक्ती निघून गेली आहे. त्यांच्या जाण्याने साहित्य, वैचारिक चळवळींच्या क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी पोस्ट सकाळच्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे यांनी आपल्या फेसबूक पेजवर टाकली आहे.