युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर (Ukraine) बॉम्ब हल्ले केले, मात्र त्याचा आवाज जागतिक शेअर बाजारात ऐकायला मिळाला. युद्धामुळे शेअर बाजारामध्ये नकारात्मक वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. चीन, जपान, तैवान, भारतासह अशिया खंडातील जवळपास सर्वच शेअर बाजार कोसळले आहेत. शेअर बाजार सुरू होताच शेअर बाजारात तब्बल तीन टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. शेअर बाजार सातत्याने घसरत असल्याने गुंतवणूकदारांचे गेल्या काही दिवसांमध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गुंतवणूकदारांना तब्बल दहा लाख कोटींचा फटका बसला आहे. 2020 नंतर प्रथमच शेअर बाजारात एवढी घसरण पहायला मिळाली.
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच युद्धामुळे अनिश्चिततेचे सावट निर्माण झाल्याने शेअर विक्रीचा दबाव वाढला आहे. याबाबत बोलताना एस सिक्योरिटीजचे इक्विटी हेड अमर अंबानी यांनी म्हटले आहे की,. युद्ध कोणतेही असो, युद्धानंतर बाजारात तेजी येते. मात्र युद्धादरम्यान मंदीचे सावट असते. मग तो व्हियेतनामचा तणाव असूद्यात की अफगानिस्तानमधील तालीबान्याचे बंड प्रत्येकवेळी हीच स्थिती पहायला मिळाली.
रशिया ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. त्यामुळेच रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू होताच कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 103 डॉलरवर पोहोचल्या आहेत. येणाऱ्या काळात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 130 डॉलरपर्यंत जाऊ शकतात. कच्च्या तेलाचे दर अचानक वाढल्याने महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा धातूंच्या किमतीवर देखील होताना दिसून येत आहे. सोने आणि चांदीच्या दरात अचानक मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. भारतामध्ये सोन्याचे दर प्रती तोळा 51000 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदी 66000 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. येणाऱ्या काळात मौल्यवान धातुच्या कीमती आणखी वाढू शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.