आज दि.२५ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

मी कुठेही पळून जाणार
नाही : युक्रेनचे राष्ट्रप्रमुख

वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जारी केलेल्या निवेदनामध्ये रशियाच्या हल्ल्यापुढे नमणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. “शत्रूनं (रशिया) मला त्यांचा नंबर वन शत्रू म्हणून टार्गेट केलं आहे. माझं कुटुंब हे त्यांचं नंबर दोनचं टार्गेट आहे हेही मला माहिती आहे. त्यांना युक्रेनच्या राष्ट्रप्रमुखालाच लक्ष्य करून युक्रेनला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करायचं आहे. पण मी कुठेही पळून जाणार नाही. मी राजधानीतच राहणार आहे. माझं कुटुंब देखील युक्रेनमध्येच आहे”, असं वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशामध्ये म्हटलं आहे. त्यापाठोपाठ आता त्यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ते नाझी असल्याचा आणि त्यांच्यापासून युक्रेनला मुक्त करण्याचा दावाच खोडून काढला आहे.

युक्रेनमध्ये राहणाऱ्या ४,०००
भारतीयांना बाहेर काढले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन करून या संकटावर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले की, युक्रेनमध्ये राहणाऱ्या २०,००० भारतीयांपैकी ४,००० भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे.

१६ हजार भारतीय नागरिकांना बाहेर
काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न

रशिया-युक्रेन युद्धात सुमारे १६ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. युक्रेनमधील सर्व हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे, त्यामुळे सरकारला तेथील भारती नागरिकांना बाहेर काढणे कठीण झाले आहे. मात्र, त्यासाठी सरकारने नियोजन केले आहे. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले आहेत, हे सर्व विद्यार्थी भारत सरकारकडे मदतीची याचना करत आहेत.

पडझडीनंतर सेन्सेक्स जवळपास
1600 अंकांनी वधारला

काल झालेल्या जोरदार पडझडीनंतर आज सकाळी भारतीय शेअर सावरलाय. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांकांनी कालचं निम्मं नुकसान भरुन काढलंय. निफ्टी सध्या जवळपास ४०० अंकांनी वधारलाय तर सेन्सेक्स सुद्धा जवळपास 1600 अंकांनी वर आलाय. कालच्या सगळ्याच दिग्गज कंपन्यांचे शेअर अगदी कमी किंमतीत उपलब्ध झाले होते. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1600 अंकांनी वधारून 56165 अंकांवर पोहचला तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक निफ्टी 400 हून अधिक अंकांनी वधारून 16735 अंकावर पोहचले.

युक्रेनमधील १३७ लोकांचा मृत्यू

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज दुसरा दिवस असून आतापर्यंत क्षेपणास्त्र आणि बॉम्बस्फोटात युक्रेनमधील १३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. रशियाची अनेक विमानेही नष्ट झाली आहेत. रशिया-युक्रेन युद्धावर जगभरातील सर्व देश चिंता व्यक्त करत आहेत. त्याचवेळी युक्रेन संकटावर वक्तव्य करताना तालिबानने दोन्ही बाजूंनी संयम बाळगण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. दोन्ही देशांनी शांतता राखावी असे आवाहन तालिबानने केले आहे.

हिजाब आणि भगवा यावरुन भांडू
नका : शहीद जवान अल्ताफ अहमद

हिजाब आणि भगवा यावरुन भांडू नका. जेव्हा आम्ही अशा गोष्टी पाहतो तेव्हा आम्हाला फार त्रास होतो,” हे शब्द आहेत एका भारतीय सैनिकाकडून आलेल्या शेवटच्या काही व्हॉइस मेसेजेसमधील. भारतीय लष्करामध्ये हवालदार म्हणून सेवा बजावत असणारे ३७ वर्षीय अल्ताफ अहमद हे काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनात बर्फाखाली अडकले आणि शहीद झाले.

सुब्रम्हण्यम यांना चेन्नईतून
सीबीआयने केली अटक

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) मध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या गोंधळाच्या प्रकरणी सीबीआयने आनंद सुब्रमण्यन यांना अटक केली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ही माहिती दिली. राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आनंद सुब्रम्हण्यम हे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत. सुब्रम्हण्यम यांना चेन्नईतून सीबीआयने अटक केली आहे. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

मंत्री नवाब मलिक
यांची प्रकृती बिघडली

महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रींगप्रकरणी ईडीने (ED) अटक केली. बुधवारी 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली. त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांना मुंबईतल्या जे जे रुग्णालयात (JJ Hospital) दाखल करण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना आज तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आलं. मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची
सुनावणी आता 28 फेब्रुवारीला

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. या आरक्षणाची येत्या शुक्रवारी म्हणजेच 25 फेब्रुवारीला सुनावणी होऊन न्यायालय आपला अंतिम निर्णय देईल, अशी आशा होती. मात्र सुनावणी 28 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली गेल्याने या आरक्षणाचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडला आहे. न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार यांच्या खंडपीठाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील ओबीसींच्या आरक्षणा ला स्थगिती दिली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने पुन्हा एक अर्ज दाखल करीत ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी दाद मागितली आहे. सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची
पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा

रशिया आणि यूक्रेनमधील संघर्ष आता अधिक तीव्र झालाय. रशियाचे लढावू विमान, हेलिकॉप्टरद्वारे यूक्रेनवर मिसाईल हल्ला केला जातोय. त्यामुळे यूक्रेनमध्ये मोठी चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती पुतिन यांनी यूक्रेनबाबत सध्यस्थितीच्या घटनाक्रमांची माहिती पंतप्रधान मोदी यांना दिली. सोबतच पंतप्रधान मोदी यांनी रशिया आणि नाटो गटातील मतभेद केवळ चर्चेतूनच सोडवले जाऊ शकतात हा दृढविश्वासाचा पुनरुच्चार केल्याची माहितीही पीएमओने दिलीय.

आता जगावर अणु युद्धाचा
धोका, नाटोचा इशारा

रशियाने युक्रेनवर हल्ला चढवल्यानंतर आता जगावर अणु युद्धाचा धोका निर्माण झालाय. नाटो च्या एका माजी प्रमुखांच्या मते रशिया आणि यूक्रेनमधील संघर्षामुळे अणु युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे. युरोपचे माजी NATO डेप्युटी सुप्रीम अलाईड कमांडर जनरल सर एड्रियन ब्रॅडशॉ यांनी सांगितलं की, रशियाच्या सैन्याने नाटो भागात पाय टाकला तर नाटोचे सदस्य रशियाविरोधात युद्ध पुकारतील. यूक्रेनच्या पूर्वेला नाटोचे सदस्य देश आहेत. अशावेळी या देशांवर रशियाकडून चुकूनही हल्ला झाला तरी भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते!

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.