पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. माझ्याकडे भावना व्यक्त करायला शब्दच नाही. दयाळू आणि सर्वांची देखभाल करणाऱ्या लतादीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने देशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीच भरून निघणारं नाही. आपल्या सूरेल आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करण्याची त्यांच्यात अद्वितीय क्षमता होती. भारतीय संस्कृतीच्या दिग्गज म्हणून येणारी पिढी त्यांना कायम स्मरणात ठेवेल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. मोदींसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्विटरवरून लतादीदींना श्रद्धांजली वाहताना त्यांच्यासोबतचे फोटोही शेअर केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकापाठोपाठ तीन ट्विट केली आहेत. लतादीदींनी अनेक दशके फिल्मी जगतातील बदल पाहिला. सिनेमापलिकडे भारताच्या विकासाबाबत त्या विचार करायच्या. त्यांना नेहमी एक मजबूत आणि विकसित भारत पाहायचा होता. लतादीदींसोबत अनेकदा गप्पा झाल्या. त्या अविस्मरणीय होत्या. लतादीदींच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. त्यांच्या कुटुंबासोबत मी संवाद साधला. त्यांच्या प्रती माझ्या संवेदना आहे, असं ट्विट मोदींनी केलं होतं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. लतादीदींचं निधनाची बातमी जशी जगभरातील लोकांसाठी धक्कादायक आहे. तशीच माझ्यासाठीही धक्कादायक आहे. त्यांच्या गाण्याने संपूर्ण देशाला मोहून टाकले होते. एखादा कलाकार देशात एकदाच जन्माला येतो. माणूस म्हणूनही लतादीदी महान होत्या. जेव्हा मी तेव्हा भेटलो तेव्हा मला हे प्रकर्षाने जाणवले. एक दैवी आवाज आज लोपला आहे. पण त्यांचे सूर कायम राहतील, अशी भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे.
जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परिसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील, अशी भावना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी ब्रीच कँडीत जाऊन लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी मंगेशकर कुटुंबाचे सांत्वनही केलं.
लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन मंगेशकर कुटुंबीयांचे सांत्वन केलं. लतादीदी या देशाची शान आणि संगीत जगतातील स्वर शिरोमणी होत्या. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झालं आहे. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे. सर्व संगीताच्या साधकांसाठी त्या प्रेरणादायी होत्या. त्यांनी 30 हजाराहून अधिक गाण्यांना स्वर देऊन संगीताच्या दुनियेला स्वरसाज चढवला आहे. त्या खूप शांत होत्या आणि अलौकीक प्रतिभेच्या धनी होत्या. जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा मी त्यांची गाणी ऐकत असतो, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महान पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ही देशातील प्रत्येक कुटुंबाकरिता दुःखद बातमी आहे. हा दिवस अटळ आहे हे माहिती असून देखील हा दिवस येऊच नये असे वाटत होते. भारतरत्न लता मंगेशकर यांचे संगीत देश, भाषा व काळ यांच्या सीमा उल्लंघून थेट अंतरात्म्याला जागवणारे होते. आपल्या भावगीतांनी ईश्वराला जागविण्याची, प्रेमगीतांनी तरुणाईला खुलवण्याची, देशभक्तीपर गीतांनी जवानांना स्फुरण देण्याची तर प्रेमळ अंगाईगीतांनी तान्हुल्यांना निजविण्याची अद्भुत जादू त्यांच्या स्वरात होती, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शोक व्यक्त केला आहे.
अजीब दास्ताँ है ये…. कहाँ शुरु कहाँ खतम्, ये मंजिलें हैं कौनसी… ? ना वो समझ सके, ना हम…’ सारख्या हजारो सूरमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयंच नव्हे तर, जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न होतं. लतादिदींच्या निधनानं ते स्वप्न आज भंगलं आहे. संगीतविश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे. लतादिदींच्या सुरेल सूरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं. जाण्यानं महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक जण, प्रत्येक घर आज शोकाकूल आहे. स्वर्गीय आनंद देणारी लतादिदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादिदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही.