एकीकडे भारतामध्ये कोरोना रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे जगभरातील २२ देशामध्ये कोरोनाची तिसरी लाट आलीय. ब्राझील, फ्रान्स, युक्रेन आणि रशियासारख्या देशांचा समावेश आहे. जगभरामध्ये कोरोनाचे १३ कोटी ३० लाखांहून अधिक रुग्ण आढळून आल्याचं आयएएनएसने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. यापैकी २८ लाख ८६ हजार जणांचा मृत्यू झालाय. तर १० कोटी ७२ लाख जणांनी कोरोनावर मात केलीय. जगभरामध्ये दोन कोटी २८ लाख लोकांवर उपचार सुरु आहे. उपचार सुरु असणाऱ्यांपैकी २ कोटी २७ लाख जणांना कोरोनाची कमी अधिक प्रमाणात लक्षणं दिसून येत आहेत तर ९९ हजार ५०० हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
जगभरामध्ये कोरोनाची दुसरी लाट सर्वाधिक घातक ठरली आहे. या दुसऱ्या लाटेमध्येच कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलीय आणि सर्वाधिक मृत्यू सुद्धा याच कालावधीमध्ये झालेत. २१ फेब्रुवारी रोजी जगामध्ये सर्वात कमी म्हणजे तीन लाख २२ हजार रुग्ण आढळून आले होते. यानंतर मात्र सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. या कालावधीत कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असला तरी सध्या दिवसाला पाच लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण जगभरामध्ये आढळून येत आहेत.
अमेरिकेत दिवसात तीन लाख रुग्ण
अमेरिकेत दुसऱ्या लाटेमध्ये या संख्येत एक हजार पटींनी वाढ झाल्याचं दिसून आलं. दुसऱ्या लाटेत एका दिवशी अमेरिकेत तब्बल तीन लाख ८० हजार रुग्णही आढळून आलेत. याचप्रमाणे ब्राझीलमध्ये पहिल्या लाटेत दिवसाला ७० हजार कोरोना रुग्ण आढळून यायचे ती संख्या ९७ हजारांहून अधिक झाल्याचे दुसऱ्या लाटेत पहायला मिळालं.
जपानमध्ये चौथ्या लाटेची भीती
जपानमध्ये १०७ दिवसांनंतर ऑलम्पिक सुरु होणार आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी जपानमध्ये अडीच हजार नवे रुग्ण आढळून आल्याने देशात चौथी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. जपानचे आरोग्य मंत्री नोरीहिसा तामुरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटीश व्हेरिएंटमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय.
युरोपमध्ये ११ लाख मृत्यू
युरोपमधील ५१ देशांमध्ये आतापर्यंत ११ लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. युनायटेड किंग्डम, रशिया, फ्रान्स, इटली आणि जर्मनीसहीत पाच युरोपीयन देशांमध्ये एकूण करोना मृत्यूंपैकी ६० टक्के मृत्यूंची नोंद झालीय. तर अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या पाच लाख ५५ हजार इतकी आहे.
अवर वर्ल्ड इन डेटाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार रविवारपर्यंत किमान ३७ कोटी ३० लाख जणांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आलाय. जागतिक आरोग्य संघटनेने जगातील गरीब देशांना लस पुरवठा करण्यासाठी मोठ्या देशांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं आहे.